Join us

Asia Cup 2022: "यंदाचं वर्ष पाकिस्तानचं देखील असू शकतं", आशिया चषकाबाबत वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

आशिया चषकात आज भारत आणि श्रीलंका आमनेसामने असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 17:03 IST

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) आज भारत आणि श्रीलंका  (IND vs SL) यांच्यामध्ये सामना होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. कारण आजच्या सामन्यातील विजेता संघ किताबाकडे कूच करेल तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या सामन्याच्या आधीच भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघाने एकही सामना गमावला तर 2022 च्या आशिया चषकाचा विजेता पाकिस्तान असू शकतो, असे मोठे विधान सेहवागने केले आहे.  

भारतीय संघावर अधिक दबाव वीरेंद्र सेहवागने क्रिकबजशी संवाद साधताना म्हटले, "जर भारतीय संघाने आणखी एक जरी सामना गमावला तर संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. याचा पाकिस्तानला मोठा फायदा होईल, कारण पाकिस्तानने एक जरी सामना हरला तरी ते दुसऱ्या सामन्यात विजय मिळवतात. त्यांचा रनरेट त्यांना अंतिम फेरीत पोहचवण्यात मदत करेल. कारण त्यांनी एक सामना गमावला आहे आणि दोन सामने जिंकले आहेत. भारताने एक जरी सामना गमावला तर भारत स्पर्धेतून बाहेर होईल त्यामुळे संघावर दबाव अधिक आहे."

"पाकिस्तान एका मोठ्या कालावधीनंतर फायनल खेळण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आशिया चषकात देखील मोठ्या कालावधीनंतर भारताला पराभूत केले आहे. हे वर्ष पाकिस्तानचे देखील असू शकते", अशा शब्दांत सेहवागने पाकिस्तानच्या संघाचे कौतुक केले आहे. पाकिस्तानने शेवटच्या वेळी 2014 मध्ये आशिया चषकाची फायनल खेळली होती, तेव्हा त्यांना श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानने आतापर्यंत दोन वेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. 

11 सप्टेंबरला होणार अंतिम सामनाभारतीय संघाचा आज श्रीलंकेविरूद्ध सामना होणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघाला आज आणि 8 तारखेच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा रनसंग्राम होण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबर रोजी या बहुचर्चित स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानविरेंद्र सेहवागश्रीलंका
Open in App