Join us  

'या' पाच कारणांमुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका विजयाचे स्वप्न पाहू शकते

आजपासून केप टाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ दुस-या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 11:07 AM

Open in App
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या भारत दौ-यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने लोळवले होते. विराट फक्त खो-याने धावाच वसूल करत नाही तर तो प्रतिस्पर्धी संघाचे मनोधैर्य खच्ची करुन टाकतो.

डरबन - आजपासून केप टाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ दुस-या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. 2017 या वर्षात भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. घरच्या मैदानावर खेळताना भारताने ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, श्रीलंका या संघांना धूळ चारली. नव्या वर्षात भारताचा पहिलाच दौरा दक्षिण आफ्रिकेचा असून ख-या अर्थाने भारतीय संघाच्या विराट परीक्षेला सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या भारत दौ-यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने लोळवले होते. त्यामुळे यावेळी त्या पराभवाची परतफेड करण्यास आफ्रिकन संघ उत्सुक्त असेल. दक्षिण आफ्रिकेत खेळताना भारतीय संघाला कधीही आव्हान निर्माण करता आलेले नाही. आतापर्यंत आफ्रिकेतील 17 कसोटी सामन्यांमध्ये भारताने फक्त दोन कसोटी सामना जिंकले आहेत. पण विराटच्या नेतृत्वाखाली आता दक्षिण आफ्रिका दौ-यावर गेलेला संघ आणि आधीच्या संघांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे यावेळी विराटकडून मालिका विजयाची अपेक्षा करता येईल. 

विराट कोहली एकदा का विराट कोहलीने खेळपट्टीवर पाय रोवले की सामन्याचे चित्रच पालटून जाते. विराट फक्त खो-याने धावाच वसूल करत नाही तर तो प्रतिस्पर्धी संघाचे मनोधैर्य खच्ची करुन टाकतो. त्याला धावांची प्रचंड भूक असून तो महत्वकांक्षी आहे. कर्णधार म्हणून आपल्या खेळातून तो इतरांसमोर आदर्श निर्माण करतो. त्याचा आत्मविश्वास, कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि कठिण आव्हाने पार करण्याची क्षमता त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सर्वात धोकादायक आहे.          

वेगवान गोलंदाजी मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह या भारताच्या पेस बॅट्रीने पाटा खेळपट्टयांवरही आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारताच्या 85 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताकडे प्रतिस्पर्ध्यांना धाक वाटेल असा वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, कागिसो रबाडा, वरनॉन फिलँडर यांच्यासमोर भारतीय गोलंदाज कुठेही कमी नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या उसळी घेणा-या खेळपट्टयांवर हे गोलंदाज प्रभावी मारा करु शकतात.          

फलंदाजी मुरली विजय, चेतेश्वर पूजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी परेदशातील खेळपट्टयांवर चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारताच्या आघाडीच्या फळीने खेळपट्टीवर नांगर टाकला तर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना घाम गाळावा लागेल. 

फिरकी गोलंदाज भारताकडे रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा हे चांगल्या दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत तसेच ब-याच वर्षानंतर हार्दिक पांडयाच्या रुपाने भारताला चांगला अष्टपैलू फलंदाज मिळाला आहे. वृद्धीमान सहासुद्धा यष्टीरक्षणाबरोबर चांगली फलंदाजी करतो. 

दक्षिण आफ्रिकेच्या समस्या एबीडी विलियर्स आणि डेल स्टेन यांनी नुकतेच दक्षिण आफ्रिकन संघात पुनरागमन केले आहे. केपटाऊनमध्ये दुष्काळ पडला आहे त्यामुळे पहिल्या कसोटीसाठीची खेळपट्टी तितकी उसळी घेणारी नसेल.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघ