नवी दिल्ली : केवळ एका रात्रीत मिळालेली प्रसिद्धी व पैसा यामुळेच युवा पिढी स्वत:ला विशेष समजते असे नसून सुरुवातीच्या वर्षांमध्ये आईवडिलांकडून गरजेपेक्षा अधिक मिळालेले महत्त्वही नुकसानदायक ठरते, असे मत भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले. अलीकडेच एका टीव्ही कार्यक्रमात क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के.एल. राहुल यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर द्रविड बोलत होता.
द्रविड म्हणाला,‘मोठ्या मिळकतीमुळे चरित्र प्रभावित होते असे मला वाटत नाही. मी या प्रकरणाची पैशासोबत सांगड घालणार नाही. अधिक मिळकतीमुळे हे शक्य आहे, पण केवळ हे एक कारण नाही. हे कमी वयातही होऊ शकते. अनेकदा कमी मिळकत असलेल्या कुटुंबामध्येही पाल्य जर क्रिकेटमध्ये विशेष दिसत असेल तर कुटुंबाची सर्व ऊर्जा त्याच्यावर खर्ची होत असते.’
द्रविड पुढे म्हणाला,‘स्वत:ला विशेष समजणाऱ्या व्यक्तीसाठी प्रत्येकाची कुर्बानी देण्याची तयारी असते. हे फार लहान वयापासून सुरू होते आणि पाल्यांना वाटते की मी खास असून सर्वकाही माझ्यासाठी आहे.’ द्रविडने सांगितले की,‘खेळाडू गरीब असो किंवा श्रीमंत, पण जर कुणी असे समजत असेल तर अडचण येते.
आम्हाला अनेकदा अशा समस्येला सामोरे जावे लागते. एनसीएमधील अनेक प्रशिक्षकांनी मला सांगितले की, अनेकदा सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाज सर्वांत सुमार क्षेत्ररक्षक असतात. त्यांची रनिंग बिटविन विकेट खराब असते.’ (वृत्तसंस्था)
खेळाडूंना घडविण्यात प्रशिक्षक व आईवडिलांची भूमिका महत्त्वाची असते, असेही द्रविड म्हणाला.
द्रविडने सांगितले की,‘जर खेळाडूला वय लपविण्यास सांगण्यात येत असेल तर ते चुकीचे आहे. तुम्ही त्याला खोटारडेपणा शिकवित आहात. लहान बालकांसाठी हे चांगले नाही. आईवडिलांचे प्रशिक्षकांवर ओरडणे किंवा प्रशिक्षकाने पंचाला चुकीचे ठरविणे योग्य नाही. कारण मुलांना वाटते की, हेच योग्य आहे.’ (वृत्तसंस्था)