Join us

प्रशिक्षक निवडीसाठी सल्ल्याची गरज नाही - अंशुमन गायकवाड

अंशुमन गायकवाड : पक्षपात होणार नाही, कोणाला झुकते मापही देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 03:23 IST

Open in App

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध घेताना आम्हाला कोणाच्याही सल्ल्यावर विचार करण्याची गरज भासणार नाही. आम्ही तटस्थपणे काम करणार असून, त्यासाठी एखाद्याला झुकते माप देण्याची किंवा कुणाप्रति पक्षपात करण्याची गरजच नाही, असे रोखठोक प्रतिपादन माजी प्रशिक्षक तसेच कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य अंशुमन गायकवाड यांनी बुधवारी केले. या समितीच्या तिसऱ्या सदस्य शांता रंगास्वामी आहेत. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत काल, मंगळवारी संपली.

गायकवाड म्हणाले, ‘कोहलीने स्वत:ची पसंती कळविली असली तरी नव्या कोचची निवड करताना आम्ही कुणाचेही म्हणणे विचारात घेणार नाही. आम्ही तटस्थ राहून मोकळ्या मनाने निवड प्रक्रिया पार पाडू. तीन सदस्यांची समिती बीसीसीआयच्या निर्देशांचे पालन करीत आहे. यासंदर्भात आम्ही तिघांनी परस्परात चर्चा केलेली नाही. गायकवाड म्हणाले, ‘मी आधीही कोच राहिलो आहे. कपिल यांनीदेखील या पदावर काम केले असून, सर्व गोष्टींचे नियोजन करणे, डावपेच आखणे आणि तांत्रिक गोष्टींची काळजी घेणे, हे कोचला अवगत असावे. कोणत्याही कोचला यशस्वी होण्यासाठी या तीन गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जातात.’कोहली किंवा अन्य कुणी काय बोलतात याच्याशी आमचे काही देणे-घेणे नाही. महिला संघाच्या कोचपदी डब्ल्यू व्ही. रमण यांची नियुक्ती केली. त्यावेळी कुणाचा सल्ला विचारात घेतला नव्हता. त्यावेळीदेखील बराच वाद झाला होता; पण आम्ही कुणाच्या दडपणाखाली येऊन काम केले नाही किंवा कुणाचा सल्ला घेतला नव्हता. कोहली आणि शास्त्री काय म्हणतात, याकडे आमचे लक्ष नाही. बीसीसीआयच्या धोरणानुसार नव्या प्रशिक्षकाची निवड केली जाईल. - अंशुमन गायकवाड

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ