Join us

तिसऱ्या कसोटीच्या रणनीतीत बदल नाही; वाँडरर्समध्ये विजयाच्या दिशेने योग्य पाऊल- एल्गर

एल्गरने दुसऱ्या डावात नाबाद ९६ धावांची खेळी केली. त्यासोबतच रेसी वॅन डेर डुसेन आणि तेम्बा बावुमा यांच्या उपयुक्त भागीदारीने संघाला विजय मिळवून दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 08:36 IST

Open in App

जोहान्सबर्ग : कर्णधार डीन एल्गर याच्या अनुसार भारतीय संघाविरोधात वाँडरर्समध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने योग्य पावले उचलली होती आणि सुधारणेसाठी संघात वाव असला तरी अंतिम कसोटीत यजमान संघ रणनीतीत फारसा बदल करणार नाही. पहिल्या कसोटीत ११३ धावांनी पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुनरागमन करताना दुसऱ्या कसोटीत सात गड्यांनी सामना जिंकला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

एल्गरने म्हटले की, हे सकारात्मक पाऊल आहे. त्यात कोणतीही शंका नाही आणि योग्य दिशेने पावले उचलली गेली आहेत. आम्हाला आतादेखील आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि त्यात मंगळवारी सुरू होत असलेल्या कसोटीचाही समावेश आहे. आम्हाला वेगळ्या पद्धतीने या आव्हानांचा सामना करावा लागेल आणि महत्त्वाचे हे आहे की, खेळाडू त्यावर कशी प्रतिक्रिया देतात.

एल्गरने दुसऱ्या डावात नाबाद ९६ धावांची खेळी केली. त्यासोबतच रेसी वॅन डेर डुसेन आणि तेम्बा बावुमा यांच्या उपयुक्त भागीदारीने संघाला विजय मिळवून दिला होता. कर्णधाराच्या मते, या विजयाने त्यांच्या अननुभवी संघात अखेरच्या कसोटीसाठी उत्साह असेल. आम्ही योग्य पद्धतीने पुढे जात आहोत आणि त्यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.एल्गरने म्हटले की, आमच्या संघाकडे अनुभव कमी आहे. मात्र आम्हाला माहीत आहे की, सर्वकाही आमच्या बाजूने होणार नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना मंगळवारी केपटाऊनच्या न्यूलॅण्डमध्ये सुरू होणार आहे.

एल्गरच्या मते, यजमान संघात सुधारणेला वाव आहे. तो म्हणाला की, केपटाऊन कसोटीच्या आधी आम्हाला काही बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागेल आणि रणनीतीचे कठोर पालन करावे लागणार आहे. त्यामुळे केपटाऊन कसोटीत आम्ही रणनीतीत फार बदल करणार नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App