मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्यानंतर, यंदाची आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला. यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. मात्र, आता आयपीएल जुलै-सप्टेंबर दरम्यान आयोजित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार आयपीएल २९ मार्चपासून सुरू होणार होती.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणू संक्रमणाला महामारी घोषित केल्यानंतर, जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय झाला. त्यामुळेच क्रिकेटविश्वातील सर्वात ग्लॅमरस लीग असलेली आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली, परंतु आता या स्पर्धेचे आयोजन जुलै-सप्टेंबर महिन्यात होऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, ‘या आधी दक्षिण आफ्रिकेत २००९ साली ३७ दिवसांमध्ये आयपीएल स्पर्धा खेळविण्यात आली होती. पाच आठवडे आणि दोन दिवसांमध्ये ही स्पर्धा पार पडली होती. त्यामुळेच जर काही कालावधी मिळाला, आयपीएलचे काही सामने भारतात आणि काही सामने विदेशात खेळविणे शक्य आहे. जर असे शक्य झाले नाही, तर संपूर्ण स्पर्धाच विदेशात खेळविली जाऊ शकेल, पण यासाठी जगभरातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाची स्थिती पहावी लागेल.’
यंदाच्या वर्षी जुलै-सप्टेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे सामने होणार नाहीत. मात्र, सप्टेंबर महिन्यातच आशिया चषक स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. याशिवाय भारतीय संघ टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिकाही खेळेल. आयपीएल आयोजनाविषयी संघ मालकांनी टेली कॉन्फरन्सद्वारेही मोठी चर्चा केली. मात्र, त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
बीसीसीआयचे ‘कॉस्ट कटिंग’
आयपीएल आयोजनावर टांगती तलवार असल्याने बीसीसीआय सध्या चिंतेत आहे. जर ही स्पर्धा झाली नाही, तर बीसीसीआयला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल. यासाठीच बीसीसीआयने आपल्या खर्चांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधीच बीसीसीआयने आयपीएलच्या बक्षीस रकमेत कपात केली असून, आता त्यांनी अधिकाऱ्यांच्या विमान प्रवास खर्चातही कपात करण्याचे ठरविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय अधिकाºयांचा प्रवास बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमधून होईल.
केवळ वरिष्ठ आणि कनिष्ठ निवड समितीचे प्रमुख यांनाच देशांतर्गत प्रवास बिझनेस क्लासने करण्याची मुभा असेल, तसेच विमान प्रवास ७ तासांहून अधिक असल्यास अधिकाºयांना बिझनेस क्लास प्रवास करता येईल. मात्र, त्याहून कमी वेळेच्या प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचा पर्याय अधिकाºयांसाठी असेल.