कसोटीनंतर वन डे मालिकेचा सर्वात मोठा लाभ हा असतो की, कसोटी मालिकेचा निकाल विसरता येतो. भारताने मागच्या वेळी कसोटी मालिका गमाविल्यानंतर द. आफ्रिकेवर वन डे मालिका विजय मिळविला होता. त्यावेळची भारताची कामगिरी पाहून असे वाटले होते की, आमच्या खेळाडूंवरील अपेक्षांचे फार मोठे ओझे कमी झाले. भारताने वर्चस्व राखून एकदिवसीय सामन्यांमध्ये यजमान संघाला पराभूत केले. यंदाही कसोटी मालिका विजयाची मोठी अपेक्षा होती. यजमान संघ कमकुवत आहे असे मानून मागच्या तुलनेत कैकपटींनी अपेक्षा वाढल्या होत्या. भारतीय संघ यंदाही मागच्या सारखा वन डे मालिकेत विजयी ठरला तर, नवल वाटायला नको.
राहुलकडे संघाचे नेतृत्व आहे. विशेष असे की, कोहली ब्रेक घ्यायचा तेव्हा राहुल संघात नसायचा. आता कोहली त्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. विराटची तीनही प्रकारातील कामगिरी जबर असली तरी वन डेत स्वप्नवत अशी कामगिरी आहे.
ज्या अंदाजात कोहलीने सामने जिंकून दिले तशी कामगिरी करणारा खेळाडू विरळाच. तो आता कोणत्या स्थानावर खेळेल? मागच्या मोसमात तो काही सामन्यात सलामीला खेळला. शिखर धवन पुनरागमन करीत असताना कोहली तिसऱ्या स्थानावर खेळू शकेल. भारताची फलंदाजी भक्कम असून कसोटी सामन्यांपेक्षा चांगल्या खेळपट्ट्या मिळाल्यास येथे धावांचा डोंगर पहायला मिळू शकतो.
भारताच्या गोलंदाजीतही विविधता आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात असलेल्या वेगवान माऱ्यापुढे धावा काढणे यजमानांसाठी सोपे जाणार नाही. कसोटी मालिकेच्या निकालानंतर मात्र द. आफ्रिकेला सहज लेखण्याची चूक भारतीय खेळाडू करणार नाहीत. कसोटी मालिकेत डीन एल्गरच्या नेतृत्वात संघाने
धडाकेबाजी केली. केपटाऊनमध्ये विजयी धाव घेणारा तेम्बा बावुमा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयाची पुनरावृत्ती करू शकेल? (टीसीएम)