Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त ११ सामने; आयपीएल २०२४ वर सर्व मदार

२०२४ मध्ये ४ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४  चे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांना मिळालेले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:05 IST

Open in App

भारतीय संघाला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत मोक्याच्या क्षणी मात खावी लागली... २०११ चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाला आयसीसी चषकाने हुलकावणी दिली होती. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, दोनवेळा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला हार पत्करावी लागली. २०२३चा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाने प्रचंड मेहनत घेतली आणि सलग १० सामने जिंकून स्वप्नपुर्तीच्या दिशेने झेपही घेतली. पण, ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये भारतीयांचे स्वप्न भंग केले. आता टीम इंडियाला २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत, परंतु त्याच्या तयारीसाठी भारताला फक्त ११ आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळणार आहेत.

२०२४ मध्ये ४ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४  चे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांना मिळालेले आहे.  ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, नेदरलँड्स, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज व अमेरिका यांनी आधीच स्पर्धेतील पात्रता निश्चित केली आहे. नेपाळही या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या ट्वेंटी-२० कारकीर्दिवर चर्चा सुरू आहे आणि बीसीसीआय युवा खेळाडूंसह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार आहेत. पण, हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने तो आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाही. त्याचे पुनरागमन थेट आयपीएल २०२४ मधून होईल, असा अंदाज आहे.

.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. आजपासून खऱ्या अर्थाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला भारतीय संघ लागणार आहे. पण, भारतीय संघ ११ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची सर्व मदार आयपीएल २०२४वर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक  

  • पहिली ट्वेंटी-२० - २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम
  • दुसरी ट्वेंटी-२० - २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपूरम
  • तिसरी ट्वेंटी-२० - २८ नोव्हेंबर, गुवाहाटी
  • चौथी ट्वेंटी-२० - १ डिसेंबर, नागपूर
  • पाचवी ट्वेंटी-२० ३ डिसेंबर, हैदराबाद 

 

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

  • पहिली ट्वेंटी-२० - १० डिसेंबर, डर्बन
  • दुसरी ट्वेंटी-२० - १२ डिसेंबर, गॅबेर्हा
  • तिसरी ट्वेंटी-२० - १४ डिसेंबर, जोहान्सबर्ग

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली ट्वेंटी-२० - ११ जानेवारी, मोहाली
  • दुसरी ट्वेंटी-२० - १४ जानेवारी, इंदूर 
  • तिसरी ट्वेंटी-२० - १७ जानेवारी, बंगळुरू  
टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय