Join us

एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान

हार्दिक पांड्याकडे MI चे नेतृत्व सोपवले गेल्यामुळे रोहित नाराज असल्याच्याही चर्चा या संपूर्ण पर्वात सुरू राहिल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:59 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील प्रवास संपला आहे आणि आता तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहितसाठी हे पर्व काही खास राहिले नाही. त्याने मुंबई फ्रँचायझीकडून यंदाच्या पर्वात जरी सर्वाधिक ४१७ धावा केल्या असल्या तरी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याची बॅट फार चालली नाही. त्याचा संघाला फटका बसल्याचे रोहितने मान्य केले. हार्दिक पांड्याकडे MI चे नेतृत्व सोपवले गेल्यामुळे रोहित नाराज असल्याच्याही चर्चा या संपूर्ण पर्वात सुरू राहिल्या. रोहितने यावर केव्हाच थेट भाष्य केले नाही, परंतु KKR चा सपोर्ट स्टाफ सदस्य अभिषेक नायर याच्यासोबतच्या व्हिडीओने ही नाराजी समोर आणली.

''एकेक करून गोष्टी बदलत आहेत. ते त्यांच्यावर आहे. मात्र, भावा ते माझं घर आहे. हे मंदिर मी बांधलं आहे.,''असे रोहित KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी नायरशी बोलताना दिसता. त्यात तो शेवटी म्हणाला, भाई मेरा क्या मेरा तो ये लास्ट है ( माझं हे शेवटचं वर्ष आहे, तसेही ) त्याच्या या व्हिडीओची बरीच चर्चा रंगली आणि शेवटी KKR ला तो व्हिडीओ डिलीट करावा लागला. या प्रकरणातून धास्ती घेतलेल्या रोहितचा परवा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. LSG विरुद्धच्या लढतीपूर्वी रोहित त्याचा मित्र धवल कुलकर्णीसोबत गप्पा मारताना दिसला होता. हे सर्व कॅमेरामन कैद करत असताना रोहितची त्याच्याकडे नजर पडली आणि त्याने हात जोडून त्याला विनंती केली की, ए भाई ऑडिओ बंद कर आधीच एका ऑडिओने माझी वाट लावली आहे. 

मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान दहाव्या क्रमांकावर संपुष्टात आले आहे आणि आज रोहितने घडलेल्या प्रकाराबद्दल ट्विट करून स्टार स्पोर्ट्स वाहिनीला धारेवर धरले. त्याने ट्विट केले की, क्रिकेटपटूंचे जीवन इतके अनाहूत बनले आहे की, कॅमेरे आता आमच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत, प्रशिक्षणात किंवा सामन्याच्या दिवशी गोपनीयतेत करत असलेले प्रत्येक पाऊल आणि संभाषण रेकॉर्ड करत आहेत. स्टार स्पोर्ट्सला माझे संभाषण रेकॉर्ड करू नका असे सांगूनही त्यांनी ते रेकॉर्ड केले. नंतर प्रसारित केले गेले आणि ते गोपनीयतेचा भंग करणारे आहे. exclusive content मिळवण्याची आणि केवळ TRPवर लक्ष केंद्रित करण्याची धडपड यामुळे एक दिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वासाला तडा जाईल.

 

टॅग्स :आयपीएल २०२४रोहित शर्मामुंबई इंडियन्सऑफ द फिल्ड