Join us

भारतीय संघाला लवकरच मिळणार ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ प्रशिक्षक

माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसू शकतील. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 09:13 IST

Open in App

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला. यानंतर माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. आता आयपीएलनंतर आगामी दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकांसाठी माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसू शकतील. 

आयपीएलनंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच दरम्यान भारताचा इंग्लंड दौराही होणार असल्याने बीसीसीआय यावेळी दोन वेगवेगळे संघ निवडणार असल्याची चर्चा रंगत आहे. अशा परिस्थितीत दोन स्वतंत्र प्रशिक्षकही निवडले जातील. यानुसार दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकांसाठी भारताला लक्ष्मण यांचे मार्गदर्शन लाभेल, तर इंग्लंड दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळेल. 

द्रविड यांच्या मार्गदर्शनात आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ १५ किंवा १६ जूनला इंग्लंडला रवाना होईल. त्यामुळे ९ जूनपासून रंगणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविले जाईल आणि लक्ष्मण या संघाचे प्रशिक्षक असतील.  

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘इंग्लंड दौऱ्यावर बर्मिंगहॅम कसोटीआधी २४ जूनला लेइसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना होईल. द्रविड आणि संघ १५ किंवा १६ जूनला इंग्लंडला रवाना होतील. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत मुख्य प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मण यांना विचारण्यात येईल.’

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App