ICC World Cup 2023 : आयसीसीवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचा सातत्याने बहाणा शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) आणि BCCI ने गेम केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पाकिस्तान संघाच्या सामन्यांचे स्थळ बदलण्याची मागणी केली होती, परंतु ICC व BCCI या दोघांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. भारतात ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप होणार आहे. त्यापूर्वी २० जूनला एक बैठक झाली आणि त्यात PCB च्या मागण्यांवर चर्चा झाली. त्यानुसार त्या मागण्या मान्य होणार नसल्याचे PCB ला कळवले गेले आहे.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार आता पाकिस्तानला BCCI ने सादर केलेल्या ड्राफ्टनुसार खेळावे लागणार आहे. पाकिस्तानने चेन्नई आणि बंगळुरू येथील सामन्यांची अदलाबदल करण्याची मागणी केली होती. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूत होणार आहे. पण, चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने आणि अफगाणिस्तानकडे चांगले फिरकीपटू असल्याने पाकिस्तानने हा सामना बंगळुरूत खेळवण्याची मागणी केली. बंगळुरूत होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
ड्राफ्ट नुसार १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान लढत अहमदाबाद येथे होणार आहे. पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी क्वालिफायरमधून प्रगती करणाऱ्या दोन संघांविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( २० ऑक्टोबर, बंगळुरू), अफगाणिस्तान ( २३ ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका ( २७ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध चेन्नईत सामना होईल. बांगलादेश (३१ ऑक्टोबर, कोलकाता), न्यूझीलंड ( ५ नोव्हेंबर, बंगळुरू) आणि इंग्लंड ( १२ नोव्हेंबर, कोलकाता) येथे पाकिस्तानचे सामने होतील.