The Hundred : Will Smeed smashed 101* : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला पहिला शतकवीर बुधवारी मिळाला. बर्मिंगहॅम फोनिक्स ( Birmingham Phoenix) विरुद्ध साउदर्न ब्रेव्ह ( Southern Brave) यांच्यातल्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. २० वर्षीय विल स्मीदने या लीगमधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावताना साउदर्न ब्रेव्ह संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या दमदार फटकेबाजीमुळे बर्मिंगहॅम फोनिक्स संघाने ५३ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना बर्मिंगहॅमने १०० चेंडूंत ४ बाद १७६ धावा चोपल्या. यात विल स्मीदच्या नाबाद १०१ धावा होत्या. सलामीवीर विल स्मीदने एकहाती फटकेबाजी करताना बर्मिंगहॅमसाठी धावांचा डोंगर उभा केल्या. १०० चेंडूंच्या या सामन्यात त्याने ५० चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या. त्याच्या धावांचा स्ट्राईक रेट हा २०२ इतका होता. त्याच्या व्यतिरिक्त बर्मिंगहॅमच्या ख्रिस बेंजामिन ( १७), कर्णधार मोईन अली ( १७), लिएम लिव्हिंगस्टोन ( २१) व मॅथ्यू वेड ( १०) या फलंदाजांनी योगदान दिले.
![]()
प्रत्युत्तरात साउदर्न ब्रेव्हचा संपूर्ण संघ ८५ चेंडूंत १२३ धावांत तंबूत परतला. एलेक्स डेव्हिएसने सर्वाधिक ३३ धावा केल्या. बर्मिंगहॅमच्या हेन्री ब्रुक्सने २० चेंडूंत २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. केन रिचर्डसनने १५ चेंडूंत १९ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. टॉम हेल्म व बेनी हॉवेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.