Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अंबाती रायुडूने घेतला निवृत्तीचा निर्णय 

भारताचा वन डे स्पेशालिस्ट खेळाडू अंबाती रायुडूने शनिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 15:10 IST

Open in App

कोलकाता : भारताचा वन डे स्पेशालिस्ट खेळाडू अंबाती रायुडूने शनिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या रायुडूच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय संघाला चौथ्या क्रमांकासाठी भरवशाचा फलंदाज मिळाला, असे संकेत कर्णधार विराट कोहलीनेही दिले होते. 2019च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघातील स्थान पक्के समजले जात आहे. याच कारणामुळे त्याने पाच दिवसीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 

33 वर्षीय रायुडूने भारताकडून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र, तो हैदराबाद संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळतो आणि वनडे व ट्वेंटी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार त्याने केला आहे. त्यामुळेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम केला, परंतु स्थानिक स्पर्धांमध्ये वन डे व ट्वेंटी-20 सामने खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. 2019ची विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून त्याने हा निर्णय घेतला आहे. 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्याकडे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावून एकूण 217 धावा केल्या आहेत.   

टॅग्स :बीसीसीआयअंबाती रायुडू