Join us  

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो; शाहिद आफ्रिदीचा 'सेफ गेम'

न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 1:54 PM

Open in App

कराची : न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात असून, त्यात 1 महिला तर 3 पुरुषांचा समावेश आहे. बांगलादेशचे क्रिकेटपटू या हल्ल्यातून सुदैवाने बचावले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माजी खेळाडू शोएब अख्तर यांच्यासह जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. बूम बूम आफ्रिदी यानेही या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.गोळीबार सुरू असताना मशिदीत बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूही होते, सुदैवानं त्यना काही झाले नाही. बांगलादेशची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशातील क्रिकेट टीमचा खेळाडू तमीम इक्बालनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. हल्ल्यातून वाचल्यानंतर मुश्तफिकूर रहीम यानेही ट्विट करत अल्लाहचे आभार मानले.  शोएब अख्तरनेही ट्विट केलं की,''ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटे उभे राहिले. अल्लाहच्या घरताही आपण सुरक्षित नाही? या दहशतवादी कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बांगलादेशचे क्रिकेटपटू सुखरुप असल्याचा आनंद आहे, परंतु त्याच वेळी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.''शोएबच्या ट्विटनंतर आफ्रिदीनेही निषेध नोंदवला. तो म्हणाला,''ख्राइस्टचर्च येथील घटना दुर्दैवी आहे. न्यूझीलंड हे सर्वात सुरक्षित आणि शांतताप्रीय ठिकाण आहे. या घटनेनंतर मी तमीमशी बोललो आणि बांगलादेशचे खेळाडू सुखरूप असल्याचे कळताच मोठा दिलासा मिळाला. या हल्ल्याविरोधात जगानं एकत्र यायला हवं. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे.''दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. अन्य खेळाडूंनीही हल्ल्याचा निषेध केला.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीन्यूझीलंडदहशतवादी हल्लाशोएब अख्तरइम्रान खान