Tennis Cricket Viral Video Borivali : क्रिकेट हा भारतीयांसाठी धर्म तर क्रिकेटपटू हे एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे असतात. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी टेनिस क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. टेनिस क्रिकेटच्या टूर्नामेंटचा मोठा चाहतावर्ग हा चोखंदळ तर असतोच, पण त्यासोबतच दिलदार देखील असतो. सध्या अशाच एका टेनिस क्रिकेट सामन्यातील व्हिडीओ बराच व्हायरल होताना दिसतोय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ज्या मैदानावर खेळायचा, त्या मैदानावरील हा व्हिडीओ असून त्यात फलंदाजावर एका चाहत्याने चक्क लाइव्ह सामन्यात पैसे उडवल्याचे दिसले आहे.
बोरिवलीच्या MHB ग्राऊंडवर नुकतीच राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी २०२५ खेळवण्यात आली. या स्पर्धेचे हे नववे वर्ष असून विजेत्या संघाला अडीच लाखांचे बक्षीस होते. ८-८ षटकांच्या सामन्याती फायनलच्या सामन्यात एक वेगळा प्रसंग घडला. कंधारी किंग्ज विरूद्ध शिफा स्ट्रायकर्स या सामन्यात एक किस्सा घडला. कंधारी किंग्जचा श्रेयस इंदुलकर फलंदाजी करत असताना त्याने तुफान फटकेबाजी केली. त्यावेळी दोन चाहत्यांनी चक्क लाइव्ह सामन्यात मैदानात येऊन पैशांची उधळण केली. श्रेयसने मात्र अतिशय नम्रपणे मैदानावर पडलेल्या नोटांना आधी नमस्कार केला आणि मग इनामाची रक्कम उचलून खिशात ठेवली. या गोष्टीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यात शिफा स्ट्रायकर्स संघाने ८ षटकात ११३ धावा केल्या आणि कंधारी किंग्ज संघाला ११४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस इंदुलकरने तुफानी खेळी केली. त्याने १५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. त्यानंतर ओंकार केणी याने १६ चेंडूत ५४ धावा करत संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. ओंकारने टूर्नामेंटमध्ये ९१ धावा करत सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही सन्मान मिळवले.