Join us  

...आणि कांगारूंचा माज उतरवला!; बॉर्डर-गावसकर चषकावर टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा केला कब्जा

मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याला जिगरबाज खेळाने साथ दिलेल्या भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असे पाणी पाजले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:38 AM

Open in App

गाबा : पहिल्या कसोटीतील दारुण पराभव आणि त्यानंतर पितृत्त्व रजा घेऊन मायदेशी परतलेला कर्णधार विराट कोहली यामुळे भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीमध्ये कितपत लढा देणार, अशी शंका अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी व्यक्त केली. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने संघात निर्माण केलेला आत्मविश्वास आणि त्याला जिगरबाज खेळाने साथ दिलेल्या भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळाचे सर्वोत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असे पाणी पाजले. ऑसीचे अनुभवी गोलंदाज ठरले फ्लॉप -एकीकडे ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरलेले. दुसरीकडे, भारताने आपला अर्धा संघ नवख्या खेळाडूंचा खेळविला. त्यातही गोलंदाजीची धुरा नवोदितांवरच होती.   या सामन्याआधी जोश हेजलवूड (५४ सामने), नॅथन लियॉन (९९), मिचेल स्टार्क (३३) व कॅमरुन ग्रीन (३) अशी एकूण २४९ सामन्यांचा अनुभव ऑसी गोलंदाजांकडे होता.भारताकडून टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. मोहम्मद सिराजकडे २, तर शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्याकडे प्रत्येकी एक सामन्यांचा अनुभव होता. मात्र तरीही भारतीय गोलंदाजांनी दोनवेळा कांगारुंना गुंडाळण्याचा पराक्रम केला.

३२ वर्षांत यजमानांचा पहिला पराभव -- तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला ‘गाबामध्ये भेटू’ असा इशारा दिला होता. कारण या मैदानावर गेल्या ३२ वर्षांपासून ऑस्ट्रेलियन्स अपराजित होते. त्यामुळेच त्यांना या मैदानावरचा अतिआत्मविश्वास नडला. - याआधी १९८८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा गाबा मैदानावर पराभव झालेला. त्यानंतर ऑसी संघाने येथे ३१ पैकी २४ कसोटी जिंकताना ७ सामने अनिर्णित राखले होते. ऑस्ट्रेलियाचा हा गर्वाचा फुगा अखेर टीम इंडियाने फोडला.पंत ठरला मॅचविनर -अतिआक्रमकता व बेजबाबदार खेळामुळे टीकेला सामोरा गेलेला ॠषभ पंत या विजयाचा शिल्पकार ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना ३ बाद १६७ या स्थितीनंतर पंत खेळपट्टीवर आला. त्याने आधी सावध पवित्रा घेत हळूहळू नैसर्गिक खेळ करत काही आक्रमक फटके खेळले व कांगारुंना दडपणाखाली आणले. त्याने १३८ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८९ धावा फटकावत निर्णायक खेळी केली.

जखमी वाघांनी या आव्हानांवर केली मात -- प्रमुख खेळाडू दुखापतींनी बेजार.- ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मानसिक खच्चीकरण.- माजी क्रिकेटपटूंनी केलेली ४-० पराभवाची भविष्यवाणी.- शांतीत क्रांती! : जागतिक कसोटी अजिंक्यपद तालिकेत भारत अव्वल स्थानी आला. न्यूझीलंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. - बदललेले चित्र ! : ७१ वर्षांत एकही कसोटी मालिका जिंकता न आलेल्या भारताने तीन वर्षांत दोनवेळा मालिका जिंकली आहे.- पहिल्या कसोटीतील एकतर्फी पराभवाने आलेली नकारात्मकता.

भारताच्या विजयानंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया -भारताच्या गुणवान युवा क्रिकेत संघाचे अभिनंदन. या यशावर देशाला अभिमान आहे.    - रामनाथ कोविंद, राष्ट्रपती.भारतीय संघाच्या यशाने आम्ही सर्वजण उत्साहित आहोत. टीम इंडियाचे अभिनंदन.         - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

भारतीय संघ अनिर्णितसाठी नाही, तर विजयासाठी खेळला. युवा भारतीय संघाने हे करुन दाखवले.     - सुनील गावसकर

दरवेळी जेव्हा आपल्या हिमतीला ठेच पोहचली, तेव्हा आपण संघर्ष करुन टक्कर दिली.     - सचिन तेंडुलकर 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाक्रिकेट सट्टेबाजीअजिंक्य रहाणेभारतआॅस्ट्रेलिया