Join us

IND vs SA 1st Test: करून दाखवलं! तब्बल पाच वर्षांनी टीम इंडियाने केला 'हा' पराक्रम; आफ्रिकेवर नोंदवला मोठा विजय

भारताने दक्षिण आफ्रिकेवर पाचव्या दिवशी मोठा विजय नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 20:08 IST

Open in App

IND vs SA 1st Test: आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना भारताने ११३ धावांनी जिंकला. या सामन्यात लोकेश राहुलने दमदार शतक झळकावत भारताला पहिल्या दिवशी भक्कम सुरूवात दिली. तर गोलंदाजीत मोहम्मद शमीने संपूर्ण सामन्यात आठ बळी मिळवत अप्रतिम कामगिरी केली. या दोन खेळाडूंच्या दमदार खेळाच्या जोरावरच भारताने विजय मिळवला. सेंच्युरियनच्या मैदानावर कसोटी विजय मिळवणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. या विजयासह भारताने तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा एक मोठा पराक्रम करून दाखवला.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसरा दिवस हा पावसामुळे पूर्णपणे वाया गेला होता. अशा परिस्थितीत सामन्याचा निकाल लागणार की नाही, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. पण तिसऱ्या दिवसानंतर गोलंदाजांचे 'अच्छे दिन' आले आणि पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने आफ्रिकेला पराभूत केले. भारताबाहेर कसोटीचा संपूर्ण एक दिवसाचा खेळ वाया जाऊनही भारताने सामना जिंकल्याची ही घटना तब्बल पाच वर्षांनंतर घडली. याआधी सेंट ल्युसियाच्या मैदानावर ऑगस्ट २०१६ मध्ये भारताने कसोटी जिंकली होती. त्या कसोटीचा तिसरा दिवस पूर्णपणे वाया जाऊनही पाचव्या दिवशी भारताने २३७ धावांनी विजय मिळवला होता. तसाच पराक्रम भारताने पाच वर्षांनी करून दाखवला.

कसोटीच्या पहिल्या दिवसावर फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. भारताने पहिल्या दिवशी ३ बाद २७२ धावांची दमदार सुरूवात केली. दुसऱ्या दिवशी सामन्याचा पूर्ण दिवस वाया गेला. त्यामुळे तिसऱ्या दिवसानंतर खेळपट्टी गोलंदाजांना मदत देऊ लागली. तिसऱ्या दिवसाच्या खेळात १८ विकेट्स पडल्या. तर चौथ्या दिवशी १३ विकेट्स पडल्या. पाचव्या दिवशीच्या खेळातही झटपट गडी बाद झाले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामोहम्मद शामीलोकेश राहुलविराट कोहली
Open in App