Join us

कसोटीत टीम इंडिया अव्वल, पण...

वार्षिक फेरबदलांनंतर आयसीसीने कसोटी, एकदिवसीय आणि टी२० संघांची सुधारित क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यापैकी कसोटी संघांच्या क्रमवारीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 02:48 IST

Open in App

दुबई : वार्षिक फेरबदलांनंतर आयसीसीने कसोटी, एकदिवसीय आणि टी२० संघांची सुधारित क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यापैकी कसोटी संघांच्या क्रमवारीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र २०१५-१६ मधील मालिकांची कामगिरी वगळण्यात आल्याने भारताच्या गुणसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे भारत व दुसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंड यांच्यात केवळ दोन गुणांचे अंतर राहिले आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड अव्वल असून भारतीय दुसऱ्या स्थानी आहे.

क्रमवारीमधील वार्षिक फेरबदलांपूर्वी कसोटीत अव्वलस्थानी असलेल्या भारताचे ११६ गुण, तर न्यूझीलंडच्या खात्यात १०८ गुण होते. मात्र २०१५-१६ ची आकडेवारी वगळण्यात आल्याने तसेच २०१६-१७ व २०१७-१८ मधील केवळ ५० टक्केच गुण सामावून घेतल्याने भारताचे ३ गुण कमी झाले. त्याचवेळी, न्यूझीलंडच्या खात्यात अधिकचे ३ गुण जमा झाल्याने आता भारत ११३ गुणांसह पहिल्या, तर न्यूझीलंड १११ गुणांसह दुसºया क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे.

एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र विश्वचषकामध्ये अव्वल स्थानासह खेळण्यासाठी त्यांना आगामी मालिकांमध्ये आयर्लंडविरुद्ध १-० ने व पाकिस्तानविरुद्ध ३-२ ने जिंकावे लागेल. या क्रमवारीत भारत दुसºया स्थानी असून दक्षिण आफ्रिका तिसºया आणि न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :भारत