Join us

Champions Trophy 2025 : रोहितसह टीम इंडिया गाजवेल यंदाची स्पर्धा; ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी

या स्पर्धेत कोणत्या खेळाडूचा जलवा दिसणार? कोण फायनल बाजी मारणार? यासंदर्भातील चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:39 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आठ संघ सज्ज आहेत. १९ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या मैदानातून मिनी वर्ल्ड कप स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. रोहित ब्रिगेड २० फेब्रुवारीला या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात रंगणार आहेत. या स्पर्धेत कोणत्या खेळाडूचा जलवा दिसणार? कोण फायनल बाजी मारणार? यासंदर्भातील चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघ जिंकणार अन् हिटमॅनचा जलवाही दिसणार!

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटरनं भारतीय संघ आणि या संघाचे नेतृत्व करणारा कर्णधारासंदर्भात मोठं वक्तव्या केले आहे. भारतीय संघच ही स्पर्धा जिंकेल, आणि रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल, असे भाकित या दिग्गजाने केले आहे. जाणून घेऊयात कोण आहे तो खेळाडू आणि त्याने नेमकं काय म्हटलंय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती   

कोण आहे तो दिग्गज क्रिकेटर ज्यानं भारतीय संघ अन् कॅप्टनसंदर्भात केलीये भविष्यवाणी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने अशी भविष्यवाणी केलीये की, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघच जेतेपद पटकावेल. एवढेच नाही तर कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता. कटकच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली होती. या सामन्यात त्याने ९० चेंडूत ११९ धावांची दमदार खेळी केली होती.  बियॉन्ड २३ नावाच्या क्रिकेट पॉडकास्ट कार्यक्रमात क्लार्कनं भारतीय संघ आणि कॅप्टनसंदर्भात आपलं मत व्यक्त केले आहे.

नेमकं काय म्हणाला क्लार्क?

मला वाटतं भारतीय संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा विजेता ठरेल. रोहित शर्माला मी पाठिंबा देतोय. जो पुन्हा फॉर्ममध्ये परतलाय. रोहित शर्मा हा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी त्याचा खेळ बघायला मजा आली. भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच सर्वोत्तम खेळीची अपेक्षा असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील रोहित शर्माचा रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मानं आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यात त्याने ५३.४४ च्या सरासरीसह ४८१ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. जर यंदाच्या हंगामात त्याची बॅट तळपली तर तो या स्पर्धेत भारताकडूनच नव्हे तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरू शकतो. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेलच्या नावे आहे. त्याने १७ सामन्यात  ७९१ धावा केल्या आहेत. 

 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तान