Join us  

भारतीय खेळाडू १० महिने पगाराविना; बीसीसीआयनं ९९ कोटी थकवले

ऑक्टोबर २०१९ पासून भारतीय क्रिकेटपटूंना पगार आणि सामना शुल्क नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 11:02 AM

Open in App

नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयनं (BCCI) गेल्या १० महिन्यांपासून खेळाडूंना पगार दिलेला नाही. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना गेल्या ऑक्टोबरपासून पगार आणि सामना शुल्क मिळालेलं नाही. बीसीसीआय त्यांच्याशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना त्यांच्या श्रेणीनुसार वर्षातून चार वेळा (तिमाही पद्धतीनं) पगार देतं. मात्र गेल्या १० महिन्यांपासून खेळाडूंना पगार मिळालेला नाही.पगारासोबतच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना सामना शुल्कदेखील मिळालेलं नाही. डिसेंबर २०१९ पासून भारतीय क्रिकेट संघ २ कसोटी, ९ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळला आहे. मात्र बीसीसीआयनं अद्याप या सामन्यांचं शुल्क आणि या कालावधीतील पगार खेळाडूंना दिलेला नाही. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयनं खेळाडूंना द्यायची रक्कम ९९ कोटी रुपये इतकी आहे.बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना त्यांच्या श्रेणीनुसार पगार मिळतो. ए प्लस श्रेणीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहचा समावेश होतो. त्यांना वर्षाकाठी ७ कोटी रुपये मिळतात. तर ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये मिळतात. तर सामना शुल्क म्हणून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी अनुक्रमे १५ लाख, ६ लाख आणि ३ लाख इतकी रक्कम देण्यात येते. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या अखेरच्या ताळेबंदात बँक खात्यात जमा असलेल्या रकमेची माहिती दिली होती. मार्च २०१८ रोजी बीसीसीआयच्या बँक खात्यात एकूण ५ हजार ५२६ कोटी रुपये होते. त्यात २ हजार २९२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीचा समावेश आहे. याशिवाय एप्रिल २०१८ मध्ये बोर्डानं स्टार टीव्हीसोबत प्रसारणासाठी ६ हजार १३८ कोटी रुपयांचा करार केला. हा करार ५ वर्षांसाठी आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहलीरोहित शर्माजसप्रित बुमराह