Join us

IND vs BAN पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; सरफराज, जुरेल अन् यश दयालला संधी

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 21:49 IST

Open in App

Indian Test Squad for Bangladesh Series:  भारतीय संघ या महिन्यात मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंतचे संघात पुनरागमन झालं आहे.

बांगलादेशविरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी १६ सदस्यांचा संघ निवडण्यात आला आहे. सरफराज खान आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांचा मधल्या फळीत समावेश करण्यात आला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालला प्रथमच कसोटी संघात संधी मिळाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली, केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही कसोटी संघात पुनरागमन करणार आहेत. हे तिघेही इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत सहभागी झाले नव्हते.

पहिल्या कसोटीसाठी मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान, यष्टिरक्षक ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि यश दयाल या चार तरुणांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दयाल वगळता तिन्ही खेळाडूंनी यंदा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले होते. दयालने नुकतेच दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत ४ बळी घेतले आहेत.

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा बांगलादेश दौरा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नईत तर दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. ६, ९ आणि १२ ऑक्टोबर रोजी तीन टी-२० सामने खेळवले जातील. ग्वाल्हेर, दिल्ली आणि हैदराबाद येथे हे तिन्ही सामने होणार आहेत.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबांगलादेशबीसीसीआय