Join us  

ICC क्रमवारीत हिटमॅन रोहित शर्माची घसरण; विंडीजच्या फलंदाजाची कुरघोडी

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेत रोहित शर्माची बॅट अपेक्षेनुसार तळपलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:51 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेत रोहित शर्माची बॅट अपेक्षेनुसार तळपलेले नाही. ट्वेंटी-20 मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2-1 असे जेतेपद पटकावले. पण, रोहितच्या बॅटमधून तीन सामन्यांत एकून 96 धावाच निघाल्या. त्यापैकी दुसऱ्या सामन्यातील 85 धावांचा समावेश होता. याचा फटका रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) ट्वेंटी-20तील फलंदाजांच्या क्रमवारीत बसला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत रोहितची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. अवघ्या एका गुणाच्या फरकानं वेस्ट इंडिजच्या फलंदाजानं रोहितला पिछाडीवर टाकले.

आयसीसीनं सोमवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत रोहितची एका क्रमांकानं घसरण झाली. तो आता 679 गुणांसह आठव्या स्थानी आला आहे, तर भारताचाच लोकेश राहुल ( 663 गुण) एक क्रमांकाच्या घसरणीसह 9 व्या स्थानी आहे. विंडीजच्या एव्हिन लुईसनं रोहितला मागे टाकले. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत लुईसनं 68, 14 व 24 धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्यानं 680 गुणांसह सातवे स्थान पटकावलं आहे. फलंदाजांत रोहित व लोकेश वगळता एकही भारतीय अव्वल दहामध्ये नाही.

पाकिस्तानचा बाबर आझम ( 879) अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच ( 810), इंग्लंडचा डेवीड मलान ( 782), न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो ( 780), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल ( 766) आणि अफगाणिस्तानचा हझरतुल्लाह झाजई ( 692) यांचा क्रमांक येतो. गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानच्या रशीद खान ( 749) आणि मुजीब उर रहमान ( 742) हे अनुक्रमे अव्वल दोन क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या अव्वल 10मध्ये एकही भारतीय नाही.

शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थानभारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अग्रवाल आणि मोहम्मद शमी यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या कागिरीचा फायदा या दोघांनाही आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झालेला पाहायला मिळाला.  मयांककने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली, तर शमीने सामन्यात सात विकेट्स मिळवल्या. या कामगिरीच्या जोरावर या दोघांनी आयसीसीच्या क्रमवारीत झेप घेतली आहे.  

कसोटी सामन्यात 243 धावांची खेळी साकारत मयांकने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीमुळे मयांकने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अकरावे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माी कर्णधार स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर आहे, तर दुसरे स्थान भारताचा कर्णधार कोहलीने पटकावले आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये शमीने सातवे स्थान पटकावले आहे. कपिल देव आणि बुमरा यांच्यानंतर शमी हा हे स्थान पटकावणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

टॅग्स :रोहित शर्माआयसीसीभारत विरुद्ध बांगलादेश