Join us

"तेव्हा मोहम्मद शमी आत्महत्या करणारच होता", जवळच्या सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:29 IST

Open in App

mohammed shami : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. पण, बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून तो पुनरागमन करणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शमीच्या पुनरागमनाबद्दल भाष्य केले. शमी शस्त्रक्रियेनंतर संघात परतण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. अलीकडेच शमीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर गोलंदाजीचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे शमी चर्चेत असताना आता त्याचा मित्र उमेश कुमारने एक मोठा खुलासा केला आहे.

उमेश कुमारने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काही वर्षांपूर्वी मोहम्मद शमीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पाकिस्तानमधील एका महिलेने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले होते तेव्हा हा प्रकार घडला होता. या आरोपांंनंतर शमी खचल्याने त्याचे कुटुंबीय खूप घाबरले होते. जेव्हा त्याच्यावर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात फिक्सिंगचा आरोप झाला आणि त्याची चौकशी झाली तेव्हा त्या रात्री शमी फार तणावात होता. याबाबत शमी म्हणाला होता की, मी सर्व काही सहन करू शकतो पण माझ्या देशाशी विश्वासघात केला नाही. त्यामुळे मी कोणतेही आरोप सहन करू शकत नाही, असेही उमेश कुमारने सांगितले.

शमीच्या मित्राचा खुलासा

उमेश कुमारने आणखी सांगितले की, सकाळचे चार वाजले होते आणि माझ्या बाटलीत अजिबात पाणी नव्हते. म्हणून मी तिथून पाणी आणायला किचनकडे निघालो. मग मी पाहिले की शमी बाल्कनीत उभा आहे, त्याच्या मनात काय चालले आहे ते मला समजले. शमीच्या आयुष्यातील ती सर्वात भयंकर रात्र होती. शमीने तेव्हा मला सांगितले की, तुझी इच्छा असेल तर तू मला मारू शकतोस पण मला पाकिस्तानसोबतच्या फिक्सिंगच्या आरोपातून मात्र बाहेर काढ... दरम्यान, या प्रकरणात शमीची जेव्हा निर्दोष मुक्तता झाली तेव्हा तो क्षण त्याच्यासाठी विश्वचषक जिंकल्यासारखा होता. त्याचा आनंद गगनात न मावणारा होता, असेही उमेश कुमारने नमूद केले. 

टॅग्स :मोहम्मद शामीभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड