Join us

बुम... बुम... बुमराह!, आयसीसी क्रमवारीत ठरला ‘नंबर वन’ गोलंदाज

आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये अफगाणिस्तानचे तीन गोलंदाज पहिल्या दहामध्ये आहेत. भारताचा विचार केला तर जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज पहिल्या दहामध्ये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 08:30 IST

Open in App

दुबई :  जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धारदार गोलंदाजीच्या बळावर ६ बळी घेतले. या जोरावर त्याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत  बुधवारी पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली. कपिल देव यांच्यानंतर नंबर वन बनणारा बुमराह दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. मनिंदरसिंग, अनिल कुंबळे  आणि रवींद्र जडेजा  या फिरकीपटूंनी याआधी अव्वल स्थान काबिज केले होते.

बुमराहने फेब्रुवारी २०२० ला न्यूझीलंडचा   ट्रेंट बोल्ट याला अव्वल स्थान गमावले होते. त्याआधी जवळपास ७३० दिवस तो अव्वल स्थानी विराजमान होता. कोणत्याही भारतीय गोलंदाजांपेक्षा तो अधिक काळ या स्थानी राहिला. सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहणाऱ्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत बुमराह नवव्या स्थानावर आहे. बुमराह टी-२० प्रकारात अव्वल स्थानावर राहिला असून, कसोटी क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी होता.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत बुमराहनंतर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर जोश हेझलवूड तर अफगाणिस्तानचा मुझीर उर रहमान पाचव्या स्थानावर आहेत. तर सहाव्या क्रमांकावर बांगलादेशच्या मेहदी हसन आहे. ख्रिस वोक्स  सातव्या क्रमांकावर, तर मॅट हेन्री  आठव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी नवव्या आणि राशिद खान दहाव्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराह
Open in App