Join us

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

Virat Kohli Test Retirement, Gautam Gambhir: विराटने तडकाफडकी घेतला निवृत्तीचा निर्णय, क्रिकेट चाहत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:53 IST

Open in App

Virat Kohli Test Retirement, Gautam Gambhir: टीम इंडियाची 'रनमशिन' विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला. टी२० विश्वचषकानंतर विराटने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर आज त्याने कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकला. आता विराट केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तसेच IPL मध्येही त्याचा जलवा कायम असणार आहे. विराटने बीसीसीआयला त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर विराटने आणखी काही काळ खेळत राहावे अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली. पण विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीवर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने विराटच्या निवृत्तीनंतर ट्विट केले. "सिंहासारखी 'पॅशन' असणारा माणूस! चिकू, क्रिकेटच्या मैदानावर आम्ही सर्वजण तुला मिस करू," अशा शब्दांत गंभीरने भावना व्यक्त केल्या.

विराटचा खास मित्र एबी डिव्हिलियर्सनेही ट्विट केले. "माझी बिस्कोटी' विराट कोहली, तुझ्या धडाकेबाज कसोटी कारकीर्दीसाठी तुझे अभिनंदन. तुझा दृढनिश्चय आणि कौशल्य मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे. तू खरा महान खेळाडू आहेस!" असे तो म्हणाला.

हरभजन सिंग म्हणाला, "विराट, आपण एकत्रच खेळलो आहोत. कठीण परिस्थितीचा सामना एकत्र केला आहे. कसोटी क्रिकेटचे दीर्घ दिवस अभिमानाने जगलो आहोत. कसोटीतील तुझी फलंदाजी खास आहे, केवळ नंबर पाहूनच नाही तर ओढ आणि प्रेरणा याबाबतीतही तू उत्तम होतास. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."

----

----

विराट कोहलीची कसोटी कारकिर्द

विराट कोहलीनं  २० जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. १२३ कसोटी सामन्यात ३० शतकांसह ३१ अर्धशतकांच्या जोरावर त्याने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे. २५४ ही कसोटीतील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

 

टॅग्स :विराट कोहलीगौतम गंभीररोहित शर्मा