भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर क्रिकेटविश्वात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. लवकरच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार असून त्याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट- रोहित यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अखेर मौन सोडले.
गौतम गंभीरने नुकतीच क्रिकेट नेक्स्टला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रोहित आणि विराटच्या कसोटी क्रिकेट सोडण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता गंभीर म्हणाला की, "निवृत्ती हा एक वैयक्तिक निर्णय आहे. संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीमधील कोणालाही खेळाडूवर जबरदस्ती करण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा अधिकार नाही. खेळ सुरू केल्यानंतर तो कधी संपावायचा, हा एक वैयक्तिक निर्णय आहे."
दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनसारखे अनुभवी भारतीय कसोटी संघाचा भाग नसल्याने पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना गंभीर म्हणाला की, "रोहित आणि कोहलीची जागा घेणे हे एक कठीण काम आहे. भारतीय संघाला दोन मोठ्या खेळाडूंशिवाय खेळावे लागणार आहे. माझ्या मते, युवा खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे."
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देताना गंभीर म्हणाला की, जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गैरहजरीत भारताने विजेतेपद पटकावले. एखाद्याला वगळल्याने दुसऱ्या व्यक्तीला देशासाठी काहीतरी खास करण्याची संधी मिळू शकते. अशा संधीची बरेच खेळाडू वाट पाहत आहेत."