Team India, Champions Trophy 2025: घरच्या मैदानावर झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर, भारतीय संघ आता पुढील मोहिमेच्या तयारीत व्यस्त आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पुढील ध्येय म्हणजे २०२५ मधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फक्त ६ दिवस शिल्लक आहेत. ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी सुरू होईल, तर अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळवला जाईल. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. ही स्पर्धा ८ वर्षांनी खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाला मोठा इतिहास रचण्याची संधी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'असे' करणारा बनू शकतो पहिलाच संघ?
भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होईल. यानंतर, टीम इंडियाला २३ फेब्रुवारी रोजी दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध असेल. टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील तिसरा आणि शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. जर रोहितच्या भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले, तर भारत एक ऐतिहासिक विक्रम रचेल.
आतापर्यंत भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक १८ सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्यानंतर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १४ सामने जिंकले आहेत. जर भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवले, तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात २० विजय मिळवणारा पहिला देश ठरेल. आजपर्यंत कोणीही ही किमया करू शकलेले नाही.
हा विक्रम करण्यासाठी भारतीय संघाला स्पर्धेत फक्त २ सामने जिंकावे लागतील. भारताला ग्रुप स्टेजमध्ये ३ सामने खेळायचे आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत तीनपैकी २ सामने जिंकावे लागणार आहेत. तसे झाल्यास भारतीय संघ पुढील फेरीत नक्की पोहोचेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे टॉप ५ संघ
- भारत - १८ विजय
- इंग्लंड - १४ विजय
- श्रीलंका - १४ विजय
- विंडिज - १३ विजय
- ऑस्ट्रेलिया - १२ विजय