लंडन : BELIEVE अर्थात विश्वास... स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून पूर्णपणे झोकून देत कामगिरी केली, तर अशक्य वाटत असलेले यशही नक्की मिळवता येते. हाच अमूल्य मंत्र टीम इंडियाने सोमवारी सर्वांना दिला. इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील पूर्ण दिवस शिल्लक असताना इंग्लंडला विजयासाठी केवळ ३५ धावा, तर भारताला चार बळींची आवश्यकता होती. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध क्रिष्णा या गोलंदाजांनी आग ओकणारा मारा करत भारताला ६ धावांनी थरारक विजय मिळवून दिला अन् भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
इंग्लंडचे वर्चस्व असतानाही आपण कसे जिंकलो?अखेरचा दिवस होता. इंग्लंडला केवळ ३५ धावांची गरज होती. जेमी स्मिथला बाद करून भारताने इंग्लंडवर दडपण टाकले. अन् विजयाकडे वाटचाल सुरू झाली. दडपणात इंग्लंडचेफलंदाज ढेपाळले.
नवीन चेंडू का नाही घेतला? काय कारण होते?दिवसाच्या सुरुवातीला सिराज व क्रिष्णा यांना जुन्या चेंडूवरही स्विंग मिळत होता. लय न गमावण्याच्या हेतूने नवा चेंडू उपलब्ध झाल्यानंतरही भारतीयांनी तो घेतला नाही. ही स्ट्रॅटेजी कामी आली.
सिराज कसा ठरला सामन्याचा हीरो?चौथ्या दिवशी सिराजकडून ब्रूकला जीवदान मिळाले. ब्रूकने शतक झळकावले. ही खंत सिराजला होती. चौथ्या दिवसाचा खेळ थांबल्यावर त्याने मोबाइलवर ‘बिलिव्ह’चा वॉलपेपर ठेवला. तोच शब्द त्याने खरा केला. भारतीयांच्या लढाऊवृत्तीचे कौतुक का केले गेले?तीन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर युवा खेळाडू मैदानात होते. स्वत:वर विश्वास ठेवला, तर कोणतेही यश मिळवता येते, हे या संघाने दाखवून दिले. कर्णधार गिल, युवा ब्रिगेडने शेवटपर्यंत हार मानली नाही.
दिग्गजांशिवाय टीम इंडिया जिंकेल? विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गजांनी घेतलेली निवृत्ती आणि पाच सामन्यांपैकी केवळ ३ सामन्यांत खेळलेला जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत युवा भारतीय संघ जिंकेल का? असा अनेकांना प्रश्न होता. मात्र, त्यांनी अभूतपूर्व लढा देत सर्वांनाच चुकीचे ठरवले.
अचानक कॉलिन कौड्रेची आठवण का काढली?इंग्लंडचे ९ बळी गेले होते. दुखापतग्रस्त ख्रिस वोक्स हात गळ्यात लटकवून ॲटकिन्सला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. त्याला सर्वांनी सलाम तर केला. त्याचवेळी, इंग्लंडचे माजी फलंदाज कॉलिन कौड्रे यांचीही आठवण झाली. त्यांनी १९६३ साली दुखापतीनंतर वेस्ट इंडिजविरूद्ध एका हाताने फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला होता.