India vs New Zealand Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या विजयासह साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकत भारतीय संघाने आपल्या गटात नंबर वन कामगिरीची नोंद केली. या कामगिरीसह आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सेमी फायनलमध्ये स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेिलयन संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुबईच्या मैदानात मंगळवारी ४ मार्चला ही लढत रंगणार आहे. दुबईच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाला ४४ धावांनी शह देण्याआधी भारतीय संघाने बांगलादेश आणि पाकिस्तान संघाला दणका दिला होता. सलग तीन विजयासह भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका कमालीच्या कामगिरीची नोंद केलीये. जाणून घेऊया टीम इंडियानं सेट केलेल्या खास रेकॉर्डवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
असा पराक्रम नोंदवणारा भारतीय संघ ठरला पहिला
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरलेल्या वरुण चक्रवर्तीनं किवींचा अर्धा संघ तंबूत धाडण्याचा पराक्रम केला. यंदाच्या हंगामात भारताकडून अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. याआधी बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत मोहम्मद शमीनं पाच विकेट्सचा कारनामा केला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात याआधी कोणत्याही संघातील गोलंदाजांनी एका हंगामात दोन वेळा पाच विकेट्स हॉलचा डाव साधलेला नाही. भारतीय संघांन यंदाच्या हंगामात ही खास कामगिरी करत नवा रेकॉर्ड सेट केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात भारत-न्यूझीलंड मॅचही ठरली खास, कारण...
एका बाजूला भारतीय संघाच्या नावे एका हंगामात दोन फलंदाजांनी पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम नोंदवला. दुसऱ्या बाजूला भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढतीतही कमालीचा अन् विक्रमी क्षण पाहायला मिळाला. पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाकडून मॅट हेन्रीनं पाच विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. धावांचा बचाव करताना वरुण चक्रवर्तीनं भारताकडून पाच विकेट्स घेत किवींच्या फलंदाजीतील जीव काढला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एका मॅचमध्ये दोन्ही संघातील गोलंदाजांनी पाच विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे ही मॅच खास आणि एक नवा विक्रम नोंदवणारी ठरली.