- अयाझ मेमन
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
दोन संघांमधील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील हा विजय भारतासाठी शानदार होता. दोन सर्वोत्तम आणि तुल्यबळ संघांमधील वर्चस्वाची ही लढत होती. भारताला विजयाचे श्रेय हे द्यायलाच हवे. टीम इंडियाने मुंबईत झालेल्या पराभवानंतर पुनरागमन केले. मुंबईत भारताला दहा गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव पाहता भारतीय संघाला व्हाईट वॉश मिळेल अशी शक्यता होती.
वानखेडे मैदानावर आॅस्ट्रेलिया संघाने त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील खोली आणि क्षमता दाखवली होती. त्याचा त्यांना मानसिकदृष्ट्या मोठा फायदा झाला होता. भारताने आॅस्ट्रेलियाला मागे टाकताना सर्वोत्तम कौशल्य, क्षमता आणि महत्त्वांकाक्षा दाखवत राजकोट आणि बंगळुरूत बाजी मारली.
अखेरच्या सामन्यातील विजय हा प्रभावी ठरला. ऑस्ट्रेलियाने नोणफेक गमावली हे फायदेशीर ठरले. चिन्नास्वामी स्टेडिअमच्या खेळपट्टीवर जास्त धावा होऊ शकतात. विशेषत: धावांचा पाठलाग करताना सोपे जाते.
भारताला फक्त ऑस्ट्रेलियाला मर्यादीत धावसंख्येत ३०० पेक्षा कमी धावांत रोखणे गरजेचे होते. स्टिव्ह स्मिथ याच्या शतकानंतरही भारताच्या गोलंदाजांनी हे काम सोपे केले. जेव्हा स्मिथ आणि लॅबुशेन खेळपट्टीवर होते. तेव्हा भारताला किमान ३२० धावांचा पाठलाग करावा लागेल, असे वाटत होते. पण रवींद्र जाडेजा याने मधल्या षटकांत बळी घेतले.
महत्त्वाचे असे की, पहिल्या स्पेलमध्ये शमी काहीसा महागडा ठरला, त्याने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये बळी घेत आॅस्ट्रेलियाचे अखेरच्या फलंदाजांना मोकळीक दिली नाही. त्यामुळे ३०० च्या वर पोहचण्याचा जो मानसिक फायदा मिळतो तो आॅस्ट्रेलिया संघाला मिळु शकला नाही.
ऑस्ट्रेलियाला २८६ धावांवर रोखल्याने कोहली सुखावला, मात्र शिखर धवनच्या दुखापतीने तो चिंतेत होता. धवनने वेदनेने विव्हळतच मैदान सोडले. यामुळे आता धवनच्या न्युझीलंड दौºयात खेळण्याबाबत शंका आहे.
राहुल बाद झाल्यावर भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने डाव सांभाळला. त्यांनी दुसºया गड्यासाठी १३७ धावांची भागिदारी करत आॅस्ट्रेलियाच्या पराभवावर शिक्का मोर्तब केले.
रोहितकडे कोणत्याही क्षणी मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. कपिल देव आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतर मी असे फलंदाज पाहिले नाही जे षटकार लगावण्यात इतरांपेक्षा पुढे असतात. रोहित बाद झाल्यावर कोहलीने अय्यरच्या साथीने विजयाकडे वाटचाल केली.
विराटने रोहितप्रमाणे मोठे फटके खेळले नाहीत. मात्र त्याने काही चित्तथरारक फटके जरूर मारले. त्याचे शतक जरी हुकले तरी या मालिका विजयात भारताचे नेतृत्व केल्याचे समाधान त्याला नक्कीच असेल.