Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs ENG: भारताची मालिकेत बरोबरी! रोहितचा इंग्लंडला इशारा; यशस्वी-बुमराहचे कौतुक

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:01 IST

Open in App

विशाखापट्टणम: भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. विशाखापट्टणम कसोटीत भारताने विजयाची नोंद करत मालिकेत बरोबरी साधली आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या डावात २९२ धावांत सर्वबाद झाला. यासह टीम इंडियाने १०६ धावांनी विजय मिळवला. विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. रोहितने भारताच्या युवा शिलेदारांचे कौतुक केले. विशेषतः यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळीला हिटमॅनने दाद दिली.  

सामन्यानंतर जसप्रीत बुमराहबाबत कर्णधार रोहित म्हणाला की, तो आमच्यासाठी चॅम्पियन खेळाडू आहे. असा सामना जिंकला की आत्मविश्वास वाढतो. या परिस्थितीत कसोटी सामना जिंकणे सोपे नाही. अशा परिस्थितीत गोलंदाजांनी आम्हाला चांगली मदत केली. तसेच यशस्वी जैस्वाल एक चांगला खेळाडू आहे. त्याची खेळण्याची शैली सर्वांना भुरळ घालते. त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याचे द्विशतक ही एक विलक्षण खेळी होती. त्याच्याकडे संघाला देण्यासारखे खूप काही आहे. मला आशा आहे की तो चांगली कामगिरी करत राहील, अशा शब्दांत रोहितने यशस्वीचे कौतुक केले.

"या विजयाने आम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल यात शंका नाही. या संघात अनेक युवा खेळाडू आहेत ही देखील अभिमानाची बाब आहे. प्रत्येकजण खूप सकारात्मक खेळत आहे. इंग्लंडचा संघ मागील काही वर्षांपासून कसोटीमध्ये चांगला खेळ  करत आहे. त्यामुळे ही मालिका सोपी नसेल. पण अजून तीन सामने उरले आहेत, पाहूयात काय होते ते आम्ही नक्कीच त्यासाठी तयार आहोत", असेही रोहित शर्माने नमूद केले.

भारताचा मोठा विजय दुसरा कसोटी सामना जिंकून यजमान भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी धावांचा डोंगर उभारला. याला प्रत्युत्तर देताना इंग्लिश संघ आपल्या पहिल्या डावात २५५ धावा करू शकला. भारताने दुसऱ्या डावात २५३ धावा करून मजबूत आघाडी घेतली. पाहुण्या इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांची आवश्यकता होती. पण, इंग्लिश संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या २९२ धावांवर गारद झाला अन् भारताने १०६ धावांनी  मोठा विजय मिळवला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ९ बळी घेतले. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेण्यात बुमराहला यश आले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघयशस्वी जैस्वालजसप्रित बुमराह