T20 World Cup 2022 : ऐकवेळ टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला नाही तरी खपवून घेऊ, पण पाकिस्तानविरुद्ध हरता कामा नये, ही भारतीय क्रिकेट चाहत्यांची भावना आजही कायम आहे. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून ही मालिका खंडित झाली. बाबर आजम अँड टीमने बाजी मारली. पण, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धींवर रोमहर्षक विजय मिळवून दिवाळी गोड केली. त्यामुळे जगभरात भारतीय चाहत्यांनी जोरात सेलिब्रेशन केले. भारतीय संघही ग्रँड डिनर पार्टीसाठी सज्ज होता आणि तशी सोयही करण्यात आली होती. खेळाडू व त्यांच्या पत्नी व मुलंही या पार्टीत सहभागी होणार होते. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी एक मेसेज केला अन् पार्टी रद्द करावी लागली. नेमकं काय घडलं?
T20 World Cup : भारतीय संघाने चाहत्याचे ६ लाख रुपये वाचवले; IND vs PAK सामन्यात मैदानावर नेमके असे काय घडले?
भारतीय संघाचा पुढील सामना २७ ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ सिडनीत दाखल झाला आहे आणि काल नेट सरावालाही सुरुवात केली. सिडनीतच भारतीय संघाची डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, संघातील सीनियर खेळाडू विराट कोहली व रोहित यांनी, पाकिस्तानवरील विजयानंतर हुरळून जाऊ नका, मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, असा मेसेज खेळाडूंना दिला.
''सामन्यानंतर झालेल्या बैठकीत खेळाडूंना ध्येयावरून भरकटू नका आणि पुढील लक्ष्याचा विचार करा. स्पर्धेची सुरुवात दणक्यात झाली आणि संघाने अशाच प्रवास कायम राखायचा आहे. स्पर्धा अजूनही संपलेली नाही, त्यामुळे पाय जमिनिवर ठेवा, असे खेळाडूंना सांगण्यात आले आहे,''अशी माहिती संघातील सपोर्ट स्टाफ सदस्याने Indian Express ला दिली. भारतीय वाणिज्य दूतावासाने भारतीय संघासाठी सिडनीत ग्रँड दिवाळी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. दिवाळीसाठी सिडनी शहरही सजलं होतं. सिडनी ओपेरा हाऊस येथेही विद्युत रोषणाई केली होती. पण, सीनियर सदस्यांच्या सल्ल्यानुसार ही पार्टी रद्द करण्यात आली.
शान मसूद ( ५२*) व इफ्तिखार अहमद ( ५१) यांच्या खेळीने पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंग ( ३-३२) व हार्दिक पांड्या ( ३-३०) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. हार्दिकने एका षटकात दोन विकेट्स घेत खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी दिली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल हे ३१ धावांवर माघारी परतले. हार्दिक ( ४०) व विराट कोहली ( ८२*) यांनी ११३ भागीदारी करून डाव सावरला अन् भारताने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"