T20 World Cup, Virat Kohli: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीसाठी नेट्समध्ये घाम गाळत आहे. पाक विरुद्धच्या पराभवाला मागे सारुन दमदार पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ सज्ज होताना दिसत आहे. पाक विरुद्धच्या पराभवाचा राग विराट कोहली जणू नेट्समध्ये काढतोय की काय असाच एक जबरदस्त व्हिडिओ आयसीसीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ आयसीसीनं फेसबुकवर शेअर केला आहे. विराट नेटमध्ये आक्रमक फलंदाजी करताना दिसत असून त्याच्या भात्यातील आक्रमक फटके पाहून भारताचे युवा क्रिकेटपटू इशान किशन आणि श्रेयस अय्यर देखील अवाक् झाले. विराट नेटमध्ये फलंदाजी करत असताना इशान आणि श्रेयस अय्यर त्याची फलंदाजी निरखून पाहात आहेत. कोहलीच्या खणखणीत फटक्यांचं दोघंही कौतुक करताना व्हिडिओत दिसून येतात. विराट नेटमध्ये चौकार आणि षटकारांचा सराव करत आहे. यात कोहलीनं कव्हर्सच्या दिशेनं लगावलेला षटकार पाहून इशान किशन आणि अय्यर पार वेडेच झाले. दोघंही हिरवळीवर झोपून कोहलीची फलंदाजी आणि फूटवर्कचा अभ्यास करताना दिसत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संघाचा ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे. साखळी सामन्यात पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानं आता भारतीय संघासाठी न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकणं महत्त्वाचं ठरणार आहे. साखळी सामन्यांमधील ब गटात सध्या पाकिस्तान ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकून दोन गुणांची कमाई करण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे.