T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : What a Match!... कालच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं अखेरच्या ४ षटकांत ५७ धावा कुटून एक षटक राखून सामना जिंकला आणि आज ऑस्ट्रेलियानंही तोच करिष्मा केला. दोन्ही गटांतून दुसऱ्या क्रमांकावरून उपांत्य फेरीत आलेल्या संघांनी Super 12 मधील स्टार संघाना स्पर्धेबाहेर फेकले. स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ ठरलेल्या पाकिस्तानची घोडदौड उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं रोखली आणि तिही नाट्यमय अंदाजात. मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड यांनी चार षटकांत जो काही हंगामा केला, त्याचे दणके पुढील अनेक वर्ष पाकिस्तानला टोचत राहतील. १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीकडून सुटलेला झेल हा पाकिस्तानसाठी टर्निंग पॉइंट ठरला असता.
बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला. त्यानं पहिल्याच षटकात ऑसी कर्णधार अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शादाब खाननं ७व्या षटकात मार्शला ( २८) माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथही ( ५) काही कमाल न करता बाद झाला. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला. शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
ग्लेन मॅक्सवेलही ७ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या. मॅथ्यू वेड व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला. शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् पाकिस्तानवर दडपण निर्माण झालं. चेंडूवर वेडनं मारलेला स्कूप षटकार अप्रतिम होता. पाचव्या चेंडूवर वेडनं आणखी एक षटकार खेचून ७ चेंडू ६ धावा असा सामना जवळ आणला. वेडनं सलग तिसरा षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
पाहा मॅचची हायलाईट्स