T20 World Cup, Mohammad Rizwan : पाकिस्तान संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना गमावला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी तुफान फटकेबाजी करताना १७७ धावांचे लक्ष्य ५ विकेट्स व १ षटक राखून पार केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान ( ६७), बाबर आजम ( ३९) व फाखर जमान ( ५५*) यांनी दमदार खेळ केला. या सामन्यात रिझवानच्या खेळवण्यावर अनिश्चितता होती. तो आणि शोएब मलिक यांना सामन्याच्या आदल्या दिवशी ताप आल्याचे वृत्त समोर आले होते. पण, हे दोघंही बरे झाले आणि आज खेळले. मात्र, रिझवानच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी केला.
मॅथ्यू हेडन म्हणाला, रिझवानला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं. तो खरा योद्धा आहे.'' पाकिस्तानी संघाचे डॉक्टर यांनी सांगितलं की,रिझवाच्या छातीत इन्फेक्शन झालं होतं आणि त्याल दोन दिवस हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. त्यातून सावरून तो देशासाठी मैदानावर उतरला. त्याच्या समर्पणाबाबत सांगावं तितकं कमीच आहे. ९ नोव्हेंबरला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते आणि दोन दिवस तो ICUमध्ये होता.''
सामन्यानंतर बाबर आजम काय म्हणाला?"मॅथ्यू वेडचा कॅच सुटणं हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. जर त्याचा कॅच घेतला असता तर मैदानावर नवा बॅट्समन आला असता. अशावेळी वेगळी परिस्थिती असती, कदाचित सामन्याचा निकालही वेगळा असता," असं बाबर आझम म्हणाला. "ज्या प्रकारे आम्ही खेळ सुरू केला तो आम्ही ठरवल्याप्रमाणेत च होता. आम्ही चांगला स्कोअरही केला. आमची गोलंदाजी आज तितकी चांगली झाली नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही कॅच सोडाल तर निकाल असाच बदलेल आणि तोच टर्निंग पॉईंटही होता," असंही त्यानं स्पष्ट केलं.