चेन्नई: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने यजमान भारतीय संघ गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरेल. भारतासाठी हा सामना 'करा अथवा मरा' असाच आहे. या सामन्याआधी होणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध बाजी मारावी, अशी प्रार्थनाही भारताला करावी लागेल. स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या झिम्बाब्वेचे आव्हान सोपे नसल्याची जाणीव असल्याने भारतीय संघाला विशेषतः फलंदाजांना या सामन्यात पूर्ण ताकदीने खेळावे लागेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या अंतराने पराभव झाल्यानंतर भारताच्या धावगतीवर मोठा परिणाम झाला. यामुळे आता भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. यासाठी भारताला सलामी जोडीसह तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाची समस्या सोडवावी लागेल.
विश्वचषकापूर्वी सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन उत्तम फॉर्ममध्ये होते. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, पोटाच्या संसर्गानंतर अभिषेकची लय बिघडली आहे. सपाट खेळपट्टयांवर ऑफ स्पिनरविरुद्ध तो अडखळ खेळत आहे.
चार सामन्यांत अभिषेकने केवळ १५ धावा केल्या आहेत. अभिषेकला बचाव व आक्रमकता यामध्ये योग्य समतोल साधावा लागेल. तिलक वर्मालाही सुधारणा करावी लागेल. अभिषेकच्या खराब फॉर्ममुळे तिलकने ईशानला चांगली साथ द्यायला हवी होती; पण तसे झाले नाही. ईशान १९३ च्या स्ट्राइक रेटने धावा करत असला तरी, दुसऱ्या बाजूकडून त्याला साथ मिळत नाही.
संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता
शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी खालच्या फळीवर आक्रमक खेळी असली, तरी त्यांना सातत्य राखावे लागेल.
ईशान, अभिषेक आणि तिलक या तिन्ही डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी पॉवरप्लेमध्ये ऑफ स्पिनरचा प्रभावी वापर केला आहे.
अव्वल तीन फलंदाजांमध्ये उजव्या हाताचा फलंदाज म्हणून संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
संघ व्यवस्थापन सूर्यकुमारला तिसऱ्या आणि तिलकला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचीही शक्यता आहे. चेपॉकची खेळपट्टी त्यांना काही प्रमाणात मदत करू शकते.
गोलंदाजांनी पकड कायम ठेवावी
झिम्बाब्वेकडे भक्कम फिरकी मारा नाही. तथापि, वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी, रिचर्ड एनगारवा आणि बॅड इव्हान्स यांच्याकडून कडवी झुंज अपेक्षित आहे.
गोलंदाजीत भारताला फारशी चिंता नसली, तरी मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे ३ बाद २० धावा अशी अवस्था झाल्यानंतरही त्यांनी ७ बाद १८७धावा केल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना मिळवलेली पकड कायम राखावी लागेल.
अशी आहे खेळपट्टी...
चेन्नईच्या खेळपट्टीवर साधारणपणे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, सध्याची खेळपट्टी फलंदाजीस पोषक मानली जाते. एम. ए. चिदंबरम स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत या खेळपट्ट्यांवर कमी सामने आयोजित करून ती जवळपास नवीकोरीच ठेवली आहे.
याचा फायदा भारतीय संघ नक्कीच घेऊ शकतो. येथील तिन्ही खेळपट्टया फलंदाजीस पोषक मानल्या जात आहेत आणि येथे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीनपैकी एक खेळपट्टी प्रामुख्याने लाल मातीची बनलेली आहे, तर उर्वरित दोन काळ्या मातीच्या आहेत.