T20 World Cup, India vs South Africa Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साजरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात चार षटकं खेळून काढल्यानंतर पाचव्या षटकाने घात केला. लुंगी एनगिडीने ५ चेंडूंत भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. भारताची अवस्था २ बाद २६ अशी केली. त्यानंतर विराट कोहलीने काही सुरेख फटके मारले, परंतु एनगिडीने त्यालाही बाद करून भारताची अवस्था ३ बाद ४१ अशी केली.
विराट कोहलीचा फॉर्म हा भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरतोय. पाकिस्तान, नेदरलँड्सविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केलीय. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनीही त्या सामन्यात अर्धशतक झळकावले. रोहितचा फॉर्म परतणे ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या सामन्यात विराटला एक मोठा विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याला अव्वल बनण्यासाठी २८ धावांची गरज आहे. माहेला जयवर्धने ( श्रीलंका) - ३१ सामने, १०१६ धावांसह आघाडीवर आहे. विराटच्या २३ सामन्यांत ९८९ धावा झाल्या आहेत. भारताने आजच्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडा हा एकमेव बदल केला आहे.
लोकेश राहुलचा फॉर्म ही भारतीयांची चिंता आहे आणि नजरा त्याच्या कामगिरीवरच खिळल्या आहेत. आफ्रिकेने डावखुरा जलदगती गोलंदाज वेन पार्नेलला पहिले षटक दिले आणि अप्रतिम गोलंदाजी करत त्याने निर्धाव षटक फेकले. कागिसो रबाडाने तीन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर
रोहित शर्माने चौथा चेंडू पुल शॉटमारून सीमेपार पाठवला. अखेरच्या चेंडूवर रोहितने सरळ फटका मारला अन् रबाडाने तितक्याच चपळतेने तो रोखला. रबाडाने तो चेंडू टिपला असता तर ती स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच ठरली असती. रोहितनंतर लोकेशने तिसऱ्या षटकात डीप मिडविकेटला षटकार खेचला. आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या लुंगी एनगिडीने पाचव्या षटकात रोहितला ( १५) बाद केले. तीन चेंडूंनतर एनगिडीने भारताला दुसरा धक्का देताना लोकेशला ( ९) माघारी पाठवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"