T20 World Cup Ind vs Pak: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर चौफेर टीका होत आहे. माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही लाजीरवाण्या पराभवानंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंवर जोरदार टीका केली. आफ्रिदीच्या मते, संघात आता नव्या आणि युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे.
बाबर, शाहीन आणि शादाब घेतले फैलावर...
एका पाकिस्तानी न्यूज शोमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, जर निर्णय माझ्या हातात असता, तर मी बाबर आजम, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानला पुढील सामन्यांसाठी बेंचवर बसवले असते. युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात मी नवख्या खेळाडूंवरच विश्वास ठेवेन, त्यांना आत्मविश्वास देईन आणि सलग खेळवेन.
आपण या खेळाडूंना खूप काळापासून पाहत आहोत. त्यांना सातत्याने संधी दिल्या जातात. प्रत्येक वेळी अपेक्षा असते की, मोठ्या संघाविरुद्ध हे खेळाडू जबाबदारीने खेळतील. हे सीनियर खेळाडू आहेत, पण जर ते कामगिरी करत नसतील, तर मग बेंचवर बसलेल्या युवा खेळाडूंना संधी का देऊ नये? असा सवाल आफ्रिदीने उपस्थित केला.
पाकिस्तानी फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी...
काल(१५ फेब्रुवारी) कोलंबो येथे झालेल्या सामन्यात बाबर आजम पुन्हा एकदा भारताविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना तो केवळ ५ धावा करून बाद झाला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीदेखील गोलंदाजीत प्रभाव टाकू शकला नाही. त्याने फक्त दोन षटकांत ३१ धावा दिल्या. याशिवाय, ऑलराउंडर शादाब खान याची कामगिरीही निराशाजनक ठरली. गोलंदाजी करताना त्याने एका षटकात १७ धावा दिल्या, तर फलंदाजीतही तो संघाला सावरण्यात अपयशी ठरला आणि संथ खेळी करत बाद झाला.
भारताचा दबदबा कायम
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मात्र दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. तसेच या विजयामुळे भारताने सुपर ८ फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
Web Summary : Following Pakistan's T20 World Cup loss, Shahid Afridi criticized senior players like Babar Azam and Shaheen Afridi. He advocated for giving opportunities to younger players, citing their poor performance against India. Afridi wants youth to play against Namibia.
Web Summary : टी20 वर्ल्ड कप में पाकिस्तान की हार के बाद शाहिद अफरीदी ने बाबर आज़म और शाहीन अफरीदी जैसे वरिष्ठ खिलाड़ियों की आलोचना की। उन्होंने युवा खिलाड़ियों को अवसर देने की वकालत की, भारत के खिलाफ उनके खराब प्रदर्शन का हवाला दिया। अफरीदी नामीबिया के खिलाफ युवाओं को खिलाना चाहते हैं।