आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालवाधीत यूएईत ही स्पर्धा पार पडणार आहे. टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध सलामीचा सामना खेळून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास सरू करतील. यूएईत होणाऱ्या या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणारी टीम इंडिया ही जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानंही स्टार स्पोर्ट्सवर बोलताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम चार संघांबाबत भविष्यवाणी केली.
T20 World Cup Schedule : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारत-पाकिस्तान कधी भिडणार
२००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरनं भविष्यवाणी केली की, टीम इंडिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.'' याचवेळी त्यानं अफगाणिस्तान संघाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा सल्लाही अन्य संघांना दिला. भारत-पाकिस्तान या सामन्यात टीम इंडियाच बाजी मारेल, असेही तो म्हणाला. पण, अंतिम फेरीत कोणते संघ प्रवेश करतील या प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर टीम इंडियाच्या चाहत्यांना रुचणारे नाही. 'इंग्लंड अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या स्थानासाठी भारत किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एक बाजी मारेल,' असे तो म्हणाला.
२०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज गतविजेता म्हणून मैदानावर उतरतील. २०१६ मध्ये त्यांनी इंग्लंडला नमवून जेतेपद पटकावले होते. भारतानं २००७मध्ये जेतेपद पटकावले होते. न्यूझीलंडला अजून एकदाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. तो पुढे म्हणाला की,''भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला नक्की पराभूत करेल. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल असे तगडे फलंदाज व गोलंदाज टीम इंडियाकडे आहेत आणि त्यांचा सामना करणे न्यूझीलंडसाठी सोपे नक्की नसेल.''