T20 World Cup, AUSTRALIA V ENGLAND : इंग्लंडनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केलं... गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीनंतर इंग्लंडचे फलंदाज सुसाट सुटले आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजांना चोपले. जॉस बटरनं एकहाती फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाची हालत खराब केली. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व ५० चेंडू राखून जिंकून ऑस्ट्रलियाचं टेंशन वाठवलं आहे. आता त्यांच्या सेमी फायनलच्या मार्गात फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस बोलावले. मागच्या सामन्यात फॉर्म परत मिळवणारा डेव्हिड वॉर्नर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस आज फेल ठरले. ऑस्ट्रेलियाचे हे चार दिग्गज २१ धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं सामना सुरुवातीलाच आपल्या मुठीत घेतला. मॅथ्यू वेड व कर्णधार अॅरोन फिंच यांच्याकडून संघर्षाची अपेक्षा होती. पण, ती फक्त फिंचनं पूर्ण केली. इंग्लंडनं सर्वच आघाडीवर आज वर्चस्व गाजवलं. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या ख्रिस वोक्सनं घेतलेला झेल अफलातून ठरला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १२५ धावांत तंबूत परतला. त्यांच्याकडून अॅरोन फिंच ( ४४) एकटाच खेळला. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना एकही षटकार मारता आला नाही, त्याउलट अॅश्टन अॅगर ( २), पॅट कमिन्स ( २) आणि मिचेल स्टार्क ( १) यांनी पाच षटकार खेचले, ख्रिस जॉर्डननं ३, वोक्सनं २ आणि टायल मिल्सनं २ विकेट्स घेतल्या.