ठळक मुद्दे''हा निर्णय समजणं मला काही जमत नाही. दोन दिवस मी याचाच विचार करत होतो. महेंद्रसिंग धोनीचा माझ्याइतका मोठा चाहता नासेल. त्यानं कर्णधारपद सोडण्यापूर्वी टीम इंडियाला भविष्याचा कर्णधार दिला. पण, या निर्णयानं मी सप्राईज झालोय.''
T20 World Cup: बीसीसीआयनं नुकतंच आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. फिरकीपटू आर अश्विन याचे चार वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात झालेले पुनरागमन सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरले. पण, त्याहीपेक्षा अनेकांना सुखद धक्का बसला तो महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्याकडे मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवल्याचा... बीसीसीआयच्या या निर्णयाचा अनेकांनी स्वागत केले, पण माजी खेळाडू अजय जडेजा ( Ajay Jadeja) याला धोनीचं पुनरागमन आवडलेलं नाही. 'एका रात्री असं काय घडलं की टीम इंडियाला मार्गदर्शकाची गरज पडली?' असा सवाल त्यानं केला.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की,'' महेंद्रसिंग धोनीसोबत मी दुबईत चर्चा केली. ही जबाबदारी पार पाडण्यास त्याची काहीच हरकत नाही आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम पाहण्यात तो तयार आहे. याबाबत मी कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबतही बोललो आणि त्यांनाही हा निर्णय पटलेला आहे.''  
पण, जडेजा म्हणतो की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत संघाला मेंटॉरची गरज नव्हती. या संघाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर घेऊन जाणारे प्रशिक्षक सोबत आहेत, मग असं काय घडलं की मेंटॉरची आवश्यकता भासली?, याचा विचार करून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे.''