Join us

टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती

Team India : विश्वविजेत्या भारतीय संघाचे मरीन ड्राईव्हवर क्रिकेट चाहत्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 10:14 IST

Open in App

Team India Victory Parade : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर जग्गजेत्या भारतीय संघाचे मुंबईत क्रिकेट चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्हवर व्हिक्ट्री परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते मरीन ड्राईव्हर जमा झाले होते. मुंबईत टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडनंतर संघाच्या एका स्टार खेळाडूने आणखी एका परेडचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. क्रिकेट चाहत्यांनी या परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील या खेळाडूने केले आहे.

ऐतिहासिक टी-२० विश्वचषकाचा विजय साजरा करण्यासाठी टीम इंडियाने मुंबईतील मरीन ड्राईव्हवरुन व्हिक्ट्री परेड काढली होती. भारतीय संघ गुरुवारी दिल्लीत दाखल झाला. चॅम्पियन भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी असंख्य चाहत्यांनी रस्त्यावर उतरून दिल्ली आणि मुंबईत विजय साजरा केला. त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील नरीमन पॉइंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत व्हिक्ट्री परेड काढण्यात आली.

मुंबईतल्या या परेडनंतर मोहम्मद सिराजने चाहत्यांना हैदराबादमध्ये आणखी एका व्हिक्ट्री रॅलीसाठी बोलावले आहे. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. "आपण आपल्या, स्वतःच्या विश्वविजेत्या मोहम्मद सिराजसोबत हैदराबादमध्ये व्हिक्ट्री रॅली पुन्हा साजरी करूया. उद्या, म्हणजे, ५ जुलै रोजी संध्याकाळी ६:३० वाजता सरोजनी आय हॉस्पिटल, मेहदीपट्टणम ते ईदगाह मैदानापर्यंत. भेटूयात सर्व हैदराबादमध्ये," असे सिराजने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मरीन ड्राइव्हवर हजारो लोकांच्या उपस्थितीत व्हिक्ट्री परेड सुरू झाल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी खुल्या बसमध्ये चाहत्यांना अभिवादन केले. बसने जवळपास १ किमीचा प्रवास करून जवळपास तासाभरात वानखेडे स्टेडियम गाठले. वानखेडेवर पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार १२५ कोटी रुपयांचा धनादेशही देण्यात आला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघमोहम्मद सिराज