लाहोर: आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याबाबतचा सस्पेन्स आता क्लायमॅक्सवर पोहोचला आहे. भारतासोबत सामना खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत सौदेबाजी सुरू केली आहे. बहिष्काराची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने आता नमते घेत चर्चेची तयारी दाखवली असली तरी, आयसीसीसमोर तीन अशा अटी ठेवल्या आहेत ज्या ऐकून क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाकिस्तान सरकारने सुरुवातीला भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले होते. १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मात्र, आयसीसीने कडक भूमिका घेतल्यावर आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विनंती केल्यानंतर पीसीबी बॅकफूटवर आले आहे. त्यांना भारताविरोधात सामना खेळायचाही आहे, बक्कळ पैसेही कमवायचेत परंतू त्यासाठी काही अटीही ठेवायच्या होत्या. यातून हे सर्व घडविण्यात आले आहे आणि आता सौदेबाजी केली जात आहे. रविवारी लाहोरमध्ये आयसीसीचे डेप्युटी चेअरमन इमरान ख्वाजा आणि पीसीबीचे मोहसीन नकवी यांच्यात ५ तास मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानने आपले खरे रुप समोर आणले आहे.
पीसीबीच्या त्या ३ अजब अटी:
१. फंडिंगमध्ये वाढ: पीसीबीची पहिली मागणी ही आहे की, आयसीसीने त्यांना मिळणाऱ्या वार्षिक महसुलात मोठी वाढ करावी. सध्याची आर्थिक स्थिती पाहता आयसीसी ही मागणी मान्य करण्याची शक्यता धूसर आहे.
२. द्विपक्षीय मालिकांचे पुनरुज्जीवन: एकीकडे वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळायला नकार देणारा पाकिस्तान, दुसरीकडे भारतासोबत द्विपक्षीय मालिका सुरू करण्यासाठी आयसीसीचा हस्तक्षेप मागत आहे. २०१२-१३ पासून दोन्ही देशांत एकही मालिका झालेली नाही आणि भारत सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की 'दहशतवाद आणि क्रिकेट' एकत्र चालू शकत नाही.
३. 'हँडशेक' प्रोटोकॉल: मैदानावर खेळभावना जपण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करणे अनिवार्य करावे, अशी तिसरी मागणी पीसीबीने केली आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या नियमावलीत हस्तांदोलन सक्तीचे असल्याचा कोणताही उल्लेख नाही.