T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ला सुरुवात झाली आहे. यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली आहे. त्यांचा साखळी फेरीतील दुसरा सामना गुरुवारी पाकिस्तानसोबत आहे. इंग्लंडकडून दारूण पराभव पत्करलेल्या पाकिस्तानसमोर लय पकडण्याचे मोठे आव्हान आहे. अमेरिकेचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून, ते शेजाऱ्यांना अडचणीत आणू शकतात. आपल्या सलामीच्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसल्याचे दिसते.
पाकिस्तानचा अष्टपैलू इमाद वसीम साइड स्ट्रेनमुळे अमेरिकेविरुद्धच्या पाकिस्तानच्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला इमाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विनंतीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी संघात दिसत आहे. त्याला आणि मोहम्मद आमिरला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला तिथे एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. पावसाच्या व्यत्ययामुळे मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले. पण, दोन सामने जिंकून यजमान इंग्लंडने २-० ने मालिका खिशात घातली.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -
६ जून - पाकिस्तान विरूद्ध अमेरिका, डल्लास
९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ