Join us

इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 

गतविजेत्या इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नामिबियाचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 03:25 IST

Open in App

T20 World Cup 2024 ENG vs NAM Live - गतविजेत्या इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नामिबियाचा पराभव केला. पावसामुळे बाधित झालेला हा सामना तीन तास उशीराने सुरू झाला आणि इंग्लंडने धावांच्या सरी बरसवल्या. १० षटकांत १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग नामिबियाला करता आला नाही. इंग्लंडने या विजयासह Super 8 साठीचे आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यामुळे ५ गुण खात्यात असलेल्या स्कॉटलंडवर दडपण आले आहे. 

इंग्लंड-नामिबिया सामना अँटिग्वा येथील सामन्यात पावसाने दमदार बॅटिंग केली. त्यामुळे गतविजेत्यांचं टेंशन वाढलं होतं. पण, अखेर १०.३० वाजता सुरू होणाार सामना १.३० वाजता सुरू झाला. ११-११ षटकांच्या या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  जॉस बटलर ( ० )आणि फिल सॉल्ट ( ११ ) लगेच माघारी परतले. ३ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये इंग्लंडने १८ धावांत दोन्ही सलामीवीर गमावले.  जॉनी बेअरस्टोच्या मदतीला हॅरी ब्रूक उभा राहिला. १८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा करणारा बेअरस्टो ८व्या षटकात झेलबाद झाला आणि ब्रूकसोबतची ३० चेंडूंत ५६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. हे षटक सुरू असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि इंग्लंडच्या ८ षटकांत ३ बाद ८२ धावा झाल्या होत्या. त्यामुळे सामना १०-१० षटकांचा झाला. 

९व्या षटकात ब्रूकने १९ धावा चोपून संघाला शतकपार नेले. मोईन अली ( ६ चेंडू १६ धावा) आणि ब्रूक यांनी १३ चेंडूंत ३८ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने १० षटकांत ५ बाद १२२ धावा केल्या. ब्रूक २० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला. लिएम लिव्हिंगस्टोन ४ चेंडूंत १३ धावा करून रन आऊट झाला.  DLS नुसार नामिबियासमोर १० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. मिचेल व्हॅन लिंगेन व निकोलस डेव्हीन या सलामीवीरांनी नामिबियाला सुरुवात तर चांगली करून दिली, परंतु त्यांना अपेक्षित धाव गती राखता आली नाही. सातव्या षटकात डेव्हीन ( १८) रिटायर्ट आऊट होऊन माघारी परतला. नामिबियाला २४ चेंडूंत ८३ धावा हव्या असताना डेव्हिड विसे मैदानावर आला. 

विसेने ८व्या षटकात आदिल राशिदची धुलाई करताना २० धावा चोपल्या. १२ चेंडूंत ५५ धावा अजूनही नामिबियाला करायच्या होत्या. लिंगेन ३४ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. विसेसोबत त्याने १८ चेंडूंत ३६ धावा जोडल्या होत्या. नामिबियाला १० षटकांत ३ बाद ८४ धावा करता आल्या आणि इंग्लंडने DLS नुसार ४१ धावांनी सामना जिंकला. विसे १२ चेंडूंत २७ धावांवर बाद झाला. त्याची ही शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा होती. त्यामुळे सर्वांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

ऑस्ट्रेलियाच्या हातात इंग्लंडची नाळ... ब गटातून ऑस्ट्रेलियाने सलग तीन विजय मिळवून सुपर ८ मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. स्कॉटलंड ( ५ गुण ) आणि इंग्लंड ( ५ ) यांच्यात दुसऱ्या जागेसाठी चुरस आहे. स्कॉटलंडचा अखेरचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या काही तासांतच होणार आहे आणि हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास इंग्लंड सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. पण, निकाल उलटा लागला किंवा पावसामुळे सामना रद्द झाला, तर स्कॉटलंड ६ गुणांसह इंग्लंडला अलगद बाहेर फेकेल. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024इंग्लंडआॅस्ट्रेलिया