T20 World Cup 2022 : भारतीय संघ पर्थमध्ये पोहोचला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आजपासून सरावासाठी मैदानावरही उतरला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आणि ते म्हणजे जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा या प्रमुख खेळाडूंची माघार... रवींद्रला अक्षर पटेल हा पर्याय भारतीय संघाने शोधला आहे, परंतु जसप्रीतच्या रिप्लेसमेंटची घोषणा अद्याप झालेली नाही. मोहम्मद शमी व दीपक चहर हे या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण, कोरोनातून सावरणाऱ्या शमीला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. अशात माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shashtri) यांनी कर्णधार रोहित शर्माला सल्ला दिला आहे.
रवी शास्त्री यांच्या मते
रोहित शर्मा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विजयाची संधीही अधिक आहे. पण, त्याचवेळी त्यांनी या स्पर्धेचे महत्त्वही टीम इंडियाला समजावून सांगितले. भारतीय संघ २३ ऑक्टोबरला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना करणार आहे. भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे आणि त्यांच्यासमोर पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व पहिल्या फेरीतून येणाऱ्या दोन संघाचे आव्हान असणार आहे. बुमराहची दुखापत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करताना शास्त्रींनी सततच्या क्रिकेटला दोष दिले.
शास्त्री म्हणाले, जसप्रीत बुमराहची दुखापत दुर्दैवी आहे. बरंच क्रिकेट खेळलं जात आहे आणि खेळाडूंना दुखापत होतेय. तो दुखापतग्रस्त झालाय, परंतु ही दुसऱ्या गोलंदाजासाठी मोठी संधी आहे. दुखापत झाल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही,''असे शास्त्री Espn Cricinfo शी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले,''माझ्या मते भारतीय संघ अजूनही तुल्यबळ आहे. जो संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकतो, तो स्पर्धेत पुढे काही करू शकतो, असे मला नेहमीच वाटते. त्यामुळे भारतीय संघाने चांगली सुरुवात करावी, उपांत्य फेरीत धडक मारावी आणि तोपर्यंत तुमच्याकडे वर्ल्ड कप जिंकणारा मजबूत संघही तयार झालेला असतो. बुमराह, जडेजा नाही याने संघाच्या मानसिकतेवर परिणाम होईल, परंतु ही दुसऱ्या खेळाडूंसाठी संधी आहे.''
शास्त्री यांनी यावेळी जसप्रीतची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्मद शमीच्या नावावर भर दिला आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियात गोलंदाजी करण्याचा अनुभव असल्याचे शास्त्री म्हणाले. शमीने २०१४ मध्ये पदार्पण केल्यापासून केवळ १७ ट्वेंटी-२० सामनेच खेळले आहेत. परंतु ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यांत त्याने २२ विकेट्स घेतल्या आहेत. २०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"