दुबई : भारताविरुद्ध मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर पाकिस्तान संघाने जबरदस्त जल्लोष केला. मात्र, यानंतर कर्णधार बाबर आझम याने खेळाडूंना, या विजयाने हुरळून जाऊ नका, लक्ष खेळावर केंद्रित करा,’ असा इशारा दिला आहे. माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हक यानेही पाकिस्तानी संघाला सावध केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे बाबरने म्हटले की, ‘आनंद साजरा करा.
हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत या क्षणाचा जल्लोष करा. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्या, की हा सामना संपला आहे आणि आता बाकीच्या सामन्यांची तयारी करायची आहे.’ बाबर पुढे म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडूने या क्षणाचा आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. पण संघातील आपली भूमिका आणि उर्वरित सामन्यांतील असलेल्या अपेक्षांकडेही त्यांनी लक्ष द्यावे. आपण येथे केवळ भारताला नमवण्यासाठी आलेलो नसून, विश्वचषक जिंकण्यास आलो आहोत, हे लक्षात असू द्या. मिसबाह आणि वकार युनुस या माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या खेळाडूंना विजयाचा आनंद साजरा करताना स्पर्धा संपलेली नसल्याचे लक्षात ठेवावे, असा संदेश दिला .