दुबई : श्रीलंकेविरुद्ध आक्रमक खेळी करीत ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवून देणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने यूएईतील मंद खेळपट्ट्यांवर फलंदाजीत धडाकेबाज सुरुवात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. वॉर्नरने काल ४२ चेंडूत ६५ धावा ठोकल्या होत्या. वॉर्नरने स्वत:च्या कामगिरीबाबत सुरू असलेल्या चर्चेला ‘जोक’ असे संबोधले. आयपीएलमध्ये सनरायजर्सने डावलल्यापासून मी अधिक क्रिकेट खेळू शकलो नाही, असे त्याने उत्तर दिले.
वॉर्नर म्हणाला, ‘माझ्या मते जे माझ्यावर टीका करतात त्यांना मी कसा आहे हे माहिती नसावे. आमच्यासाठी येथे एक चांगली सुरुवात गरजेची होती. फिंचला मैदानात फटकेबाजी करताना पाहणे माझ्यासाठी सुखद होते. माझ्याबाबतही हेच तत्त्व लागू होते. येथील खेळपट्ट्या मंद आहेत. येथे चांगली सुरुवात फारच आवश्यक ठरते.’
‘माझ्यावर कितीही टीका झाली तरी मला फरक पडत नाही. टीकाकारांनी बोलत रहावे. खेळात हे चालणारच. खेळाडू या नात्याने कधी शिखरावर असता तर कधी फारच खराब परिस्थितीतून जावे लागते. या काळात आत्मविश्वास टिकविणे महत्त्वाचे असते. चेहऱ्यावरील हास्य कायम राहील, याची काळजी घ्यावी लागते,’ असे वॉर्नरने सांगितले.