Join us

टी-२० सामन्यात २० वर्षीय महिला गोलंदाज अलिशा काडिया हिचा भेदक मारा, एका धावेत टिपले ५ बळी, संपूर्ण संघ ६ धावांत गारद

T20 Cricket News: नेपाळमधील प्राइम मिनिस्टर कप स्पर्धेमध्ये प्रोविंस नंबर वन आणि करनाली प्रोविंस यांच्यात झालेल्या सामन्यात भेदक गोलंदाजीसमोर फलंदाज हतबल झालेले दिसले. या सामन्यात Alisha Kadia हिने भेदक मारा करत अवघी १ धाव देऊन पाच विकेट्स टिपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:39 IST

Open in App

काठमांडू - टी-२० क्रिकेट सामन्यामध्ये सर्वसामान्यपणे षटकार, चौकारांची बरसात आणि धावांचा पाऊस पडताना दिसतो. मात्र नेपाळमध्ये खेळवल्या गेलेल्या महिलांच्या एका टी-२० सामन्यामध्ये गोलंदाजांचाच बोलबाला दिसून आला. प्राइम मिनिस्टर कप स्पर्धेमध्ये प्रोविंस नंबर वन आणि करनाली प्रोविंस यांच्यात झालेल्या सामन्यात भेदक गोलंदाजीसमोर फलंदाज हतबल झालेले दिसले. या सामन्यात अलिशा काडिया हिने भेदक मारा करत अवघी १ धाव देऊन पाच विकेट्स टिपल्या. संघातील आठ फलंदाज शून्यावर बाद झाले. तर संपूर्ण संघ अवघ्या सहा धावांत गारद झाला.

या सामन्यात प्रोविंस नंबर वन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये २ बाद १६६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यांच्या दोन फलंदाजांनी अर्धशतके फटकावली. त्यानंतर १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या करनाली प्रोविंसच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. त्यांची एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकली नाही.

करनाली प्रोविंसच्या ११ फलंदाजांपैकी आठ जणींना खातेही उघडता आले नाही. त्यातील सात जणी तर ओळीने शून्यावर बाद झाल्या. डावातील सर्वोच्च वैयक्तित धावसंख्या ३ ठरली. तर अन्य दोघींनी प्रत्येकी एक धाव काढली. तर एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा झाली. अखेर संपूर्ण संघ ११.४ षटकांमध्ये ६ धावांत गारद झाला. त्यामुळे त्यांना तब्बल १६० धावांच्या अंतराने पराभव पत्करावा लागला.

करनाली प्रोविंसची दाणादाण उडवण्यामध्ये २० वर्षिय फिरकीपटू अलिशा काडिया हिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने ४ षटकांमध्ये केवळ एक धाव देत पाच विकेट्स टिपल्या. या चार षटकांमधील तीन षटके तिने निर्धाव टाकली. या धडाकेबाज कामगिरीसाठी तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटनेपाळ
Open in App