India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी ४.२ षटकांत भारताला अर्धशतकी पल्ला गाठून देताना पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, ८ धावांच्या अंतराने दोघंही बाद झाले. रोहितला बाद करण्यात पाकिस्तानला यश आले, परंतु त्यांनी जगासमोर स्वतःचं हसं करून घेतलं.
![]()
भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. आता सुपर ४ मध्ये India vs Pakistan पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. पण, दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने आजच्या सामन्यात एक बदल केला असून भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत. दुखापतग्रस्त शाहनवाज दहानीच्या जागी पाकिस्तानने मोहम्मद हस्नैनला संधी दिली आहे. हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले असून रवी बिश्नोई व दीपक हुडा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. दीनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंत यष्टिंमागे दिसणार आहे.
रोहित शर्मा व
लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. नसीम शाहच्या पहिल्याच षटकात रोहितने खणखणीत चौकार व षटकार खेचला. तिसऱ्या षटकात लोकेशने नसीमच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचले. हॅरीस रौफला रोहितने झोडले अन् या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. सहाव्या षटकात रौफच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितने टोलावलेला चेंडू हवेत उंच गेला अन् खुशदिल शाहने तो टिपला. फाखर जमान व खुशदिल यांच्यात कॅचसाठी टक्कर झाली, परंतु नशीबाने पाकिस्तानची साथ दिली. रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. शादाब खानने त्याच्या पहिल्याच षटकात भारताचा दुसरा सलामीवीर लोकेशला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले. भारताला ८ धावांच्या अंतराने दोन धक्के बसले.